नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांपूर्वी कोण किती पाण्यात आहेत याची चाचपणी सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मतांची गणिते जुळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज सी-व्होटरतर्फे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यूपीमध्ये पुन्हा कमळच
सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपला ४१ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. समाजावादी पार्टीला ३२ टक्के, बहुजन समाज पार्टीला १५ टक्के आणि काँग्रेसला ६ टक्के तर इतरांच्या झोळीत ६ टक्के मते जाण्याची शक्यता आहे. जागांची आकडेवारी पाहिल्यास भाजपला २४१ ते २४९ जागा, समाजवादी पार्टीला १३० ते १३८, बसपाला १५ ते १९ जागा आणि काँग्रेसला ३ ते ७ जागा मिळू शकतात.
पंजाबमध्ये ‘आप’ची आघाडी
पंजाबच्या ११७ सदस्यीय विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला चांगलाच फायदा होऊ शकतो. सर्वेक्षणात आपला ३६ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ३२ टक्के, अकाली दलाला २२ टक्के, भाजपला ४ टक्के आणि इतरांना ६ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. कोणाला किती जागा मिळणार याबाबतची आकडेवारी पाहिली तर, आपला ४९ ते ५५ जागा, काँग्रेसला ३० ते ४७ जागा, अकाली दलाला १७ ते २५ जागा, भाजपला ० ते १ जागा मिळू शकते.
उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजप
पुढील वर्षी उत्तराखंडमधील निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला ३४ टक्के, भाजपला ४५ टक्के, आपला १५ टक्के आणि इतरांना ६ टक्के मते मिळू शकतात. जागांच्या बाबतीच बोलायचे झाल्यास काँग्रेसला २१-२५ जागा, भाजपला ४२-४६ जागा, आपला ०-४ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळू शकतात.
गोव्यात भाजपला बहुमत शक्य
४० आमदारांच्या गोवा विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. परंतु काँग्रेस सरकार बनवू शकली नाही. पुढील निवडणुकीत भाजपला २४ ते २८ जागा, काँग्रसच्या झोळीत १ ते ५ जागा, आम आदमी पार्टीला ३ ते ७ जागा, तर इतरांना ४ ते ८ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपला ३८ टक्के मते मिळू शकतात. काँग्रेसला १८ टक्के, आपला २३ टक्के आणि इतरांना २१ टक्के मते मिळू शकतात.
मणिपूरमध्येही भाजपच
सर्वेक्षणानुसार, मणिपूरमध्ये भाजपला २१ ते २५ जागा मिळू शकतात. काँग्रेसला १८ ते २२ जागा, एनपीएफला ४ ते ८ जागा, इतरांना १ ते ५ जागा मिळू शकतात. मणिपूरमध्ये बहुमतासाठी ३१ जागांची आवश्यकता आहे. मतांची बेरीज पाहिल्यास भाजपला ३६ टक्के मते, काँग्रेसला ३४ टक्के, एनपीएफला ९ टक्के आणि इतरांना २१ टक्के मते मिळू शकतात.
कोण होणार यूपीचा मुख्यमंत्री
योगी आदित्यनाथ – ४१ टक्के
अखिलेश यादव – ३१ टक्के
मायावती – १७ टक्के
प्रियंका गांधी – ४ टक्के
जयंत चौधरी – २ टक्के
इतर – ५ टक्के