नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) मोठी कारवाई केली आहे. माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि शूटर गुलाम अहमद यांच्यात मोठी चकमक झाली. एसटीएफने झाशीमध्ये एन्काऊंटर करीत दोघांना कंठस्नान घातले आहे.
उमेश पाल हत्येप्रकरणी पाच लाखांचे बक्षीस असलेले असद आणि शूटर गुलाम यांचे अखेर आज झाशीत एसटीएफने एन्काऊंटर केले आहे. प्रयागराज एसटीएफच्या पथकाने झाशीमध्ये दोघांना ठार केले. उमेश पालच्या हत्येनंतर हे पाच शूटर फरार झाले होते. यापैकी असद आणि गुलाम यांची आज एसटीएफने हत्या केली. या घटनेच्या चार दिवसांनंतर पोलिसांनी अरबाजला चकमकीत ठार मारले. उस्मान उर्फ विजय हा ६ मार्च रोजी चकमकीत ठार झाला होता.
उमेश पाल यांची २४ फेब्रुवारी २०२३ रोजी घरात घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अतिक अहमदचा मुलगा असद याच्यासह सहा शूटर सीसीटीव्हीमध्ये गोळीबार आणि बॉम्ब फेकताना दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी उमेशच्या पत्नीने अतिक, अश्रफ, शाइस्ता, अतिकचा मुलगा, गुड्डू मुस्लिम, उस्मान आणि अतिकचे अनेक अज्ञात सहकारी आणि साथीदारांविरुद्ध तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी यापूर्वीच उस्मान उर्फ विजय चौधरीला चकमकीत ठार केले होते. असद, गुलाम, गुड्डू मुस्लिम, साबीर आणि अरमान यांच्यावर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. एसटीएफ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, असद आणि गुलाम झाशीमध्ये असल्याच्या माहितीवरून गुरुवारी दुपारी पथकाने घेराव घातला. दोघांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोघेही ठार झाले. त्यांच्याकडून एक विदेशी पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. असद अहमद याच्यावर गुन्हा दाखल असून पाच लाखांचे बक्षीस होते. गुलामवर सहा गुन्हे दाखल असून त्याच्यावरही पाच लाखांचे बक्षीस होते.
झाशी येथे पोलीस चकमकीत मारला गेलेला असद हा अहमद यांचा तिसरा मुलगा होता. मोठा मुलगा उमर लखनौ तुरुंगात आहे. नंबर दोन अली नैनी तुरुंगात आहे. चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची अल्पवयीन मुले बालसुधारगृह राजरूपपूरमध्ये आहेत. माजी खासदार अतिक अहमद यांचा मुलगा असद आणि त्याचा सहकारी पोलीस चकमकीत ठार झाल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केपी मौर्य यांनी यूपी एसटीएफचे अभिनंदन केले आहे. मारेकऱ्यांना शिक्षा होणार हे निश्चित असल्याचे केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले. गुन्हेगारांना गुन्हेगारांसारखी वागणूक दिली पाहिजे, असे ते म्हणाले.
न्याय मिळण्यास सुरुवात झाल्याचे उमेश पाल यांच्या पत्नी जया यांनी सांगितले. जे काही झाले ते चांगले झाले. त्या म्हणाल्या की आज हृदयाला शांती मिळाली आहे. अतिकचाही एन्काउंटर झाला पाहिजे, तरच खरा न्याय मिळेल, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे.
उमेश पालची आई शांतीपाल यांनी सांगितले की, त्याचे एन्काऊंटर करावे अशी आमची आधीच मागणी होती. मुख्यमंत्री योगीजींचे खूप खूप आभार. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य केले आहे जे त्यांनी केले पाहिजे. जे काही घडले आहे ते कायदेशीर आधारावर ठरवले गेले आहे. हे लोक इतके दिवस धावत होते. पोलिसांनी अखेर त्यांना शोधले. मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार, खूप चांगला निर्णय घेतला आहे, माझा आत्मा समाधानी आहे. त्यांनी माझ्या मुलाला आणि त्याच्या मागे बसलेल्या गनरला गोळ्या घातल्या. आजच्या एक्नाऊंटरने मला खूप दिलासा मिळाला आहे, असे शांतीपाल म्हणाल्या.
https://twitter.com/ANINewsUP/status/1646425055998652418?s=20
UP STF Encounter Atiq Ahmad Son Asad and Shooter Gulam Jhansi