इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गाडी सुसाट पळविणे, चुकीच्या दिशेने ओव्हरटेक करणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणे आदी गोष्टी अनेकांच्या अंगवळणी पडल्या आहेत. काही क्षण प्रतीक्षा न करता प्रत्येकाला दुसऱ्याच्या पुढे जायचे आहे. या प्रवृत्तीमुळे अनेकांना स्वत:चा जीव गमवावा लागत आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेश येथे उघडकीस आली आहे. ओव्हरटेक करताना झालेल्या अपघातात जीव गमावण्याची वेळ संबंधितांवर आली असून या प्रकाराने पुन्हा एकदा वाहतुकीच्या नियमांबाबत आपण कधी सजग होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ओव्हरटेक तसेच इतर कारणांनी वर्षाकाठी लाखो अपघात होतात. त्यात हजारो जीव मृत्यूमुखी पडतात. पण, या घटनांपासून आपण कुठलाही धडा घेत नसल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशमधील घटनेने पुन्हा एकदा वाहनचालकांमधील ट्राफिक सेन्स चर्चेचा विषय बनला आहे. रामपूर मणिहरन परिसरातील बायपास महामार्गावरील उड्डाणपुलावर ११.३० वाजता हा भीषण अपघात झाला. हरिद्वारहून एक अल्टो कार येत होती. या ठिकाणी महामार्गाच्या एका बाजूला काम सुरू असल्याने दोन्ही बाजूची वाहने एकाच बाजूने बाहेर काढली जात होती. त्याचवेळी ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली.
या धडकेनंतर कारमध्ये स्फोट होऊन भीषण आग लागली. ही आग इतकी भयंकर होती की कारमधील पती पत्नीसह चौघांचा जळून जागीच मृत्यू झाला. उमेश गोयल (७०), उमेश यांची पत्नी सुनीता गोयल (६५), अमरीश जिंदाल (५५), अमरिश यांची पत्नी गीता जिंदाल (५०) अशी मृतांची नावे आहेत. हे चौघेही बसंत विहार ज्वालापूर हरिद्वार येथील रहिवासी आहेत.
योगी आदित्यनाथांनी व्यक्त केला शोक
ओव्हरटेकच्या नादात झालेला हा अपघात इतका भीषण होता की कारचे दरवाजे कापून मृतदेह बाहेर काढावे लागलेत. या घटनेची माहिती मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली. तसेच मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. या अत्यंत दु:खद घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला.