नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्रेटर नोएडामध्ये अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका निष्पाप चिमुरडीची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. शेजारच्याच तरुणाने चिमुरडीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह बॅकपॅकमध्ये ठेवून पलायन केले.
हे प्रकरण सूरजपूरच्या देवला गावाशी संबंधित आहे. रविवारी सकाळी दुर्गंधी आल्याने कुटुंबीयांनी शेजारील राघवेंद्र यांच्या खोलीचा दरवाजा तोडून शोध घेतला असता एका पिशवीत खुंटीला लटकलेल्या अवस्थेत निष्पाप चिमुरडीचा मृतदेह आढळून आला.
सायंकाळी उशिरा आलेल्या शवविच्छेदन अहवालात गळा आवळून हत्या झाल्याची बाब समोर आली आहे. यापूर्वी बलात्काराचा संशय होता, पण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याची खात्री झालेली नाही. आरोपी इतका धूर्त आहे की दोन दिवस त्याने पीडितेच्या नातेवाईकांसह मुलीला शोधण्याचे नाटक केले.
मृतदेह सापडण्यापूर्वी काही काळ आरोपी कुटुंबासोबत होता. मृतदेह असल्याची माहिती मिळताच तो पळून गेला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. राघवेंद्र हा मूळचा बलिया येथील रहिवासी आहे. मुलीचे आई-वडील चंदौली येथील रहिवासी आहेत.
देवला येथे हे कुटुंब भाड्याने राहते. वडील खासगी कंपनीत काम करतात. ७ एप्रिल रोजी वडील कामावर गेले होते, तर आई आपल्या दोन वर्षांची मुलगी आणि सात वर्षाच्या मुलाला घरात सोडून बाजारात सामान घेण्यासाठी गेली होती. ती परत आली असता मुलगी घरी आढळून आली नाही.
रात्री अकराच्या सुमारास सुरजपूर चौकीत मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती पालकांनी दिली. पोलिसांनी हरवल्याची नोंद करून तपास सुरू केला. पोलिस उपायुक्त रामबदन सिंह यांनी सांगितले की, गळा दाबून मुलीची हत्या झाल्याचे पोस्टमॉर्टममध्ये स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत.
UP Noida Crime Neighbor Killed 2 Year Old Girl