इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मेरठमध्ये आयुक्त सेल्वा कुमारी जे. इको (सायबेरियन हस्की जातीचा कुत्रा) रविवारी सायंकाळी ६ वाजता राहत्या घरातून बेपत्ता झाला. याची माहिती मिळताच पोलिस-प्रशासन आणि महापालिकेत खळबळ उडाली. प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी आठ टीम बनवून घरोघरी जाऊन कुत्र्याचा शोध सुरू केला. तब्बल २५ तासांनंतर सोमवारी सायंकाळी ७ वाजता पांडवनगर परिसरातून कुत्रा सापडला. आयुक्तांच्या निवासस्थानाचे गेट उघडे होते, त्यामुळे कुत्रा स्वतःहून आत गेल्याचे सांगण्यात आले.
रविवारी कुत्रा बेपत्ता झाल्यानंतर आयुक्तांच्या निवासस्थानी तैनात असलेले कर्मचारी आणि पोलिस सुमारे दोन तास इकडे तिकडे शोध घेत होते. खूप प्रयत्न करूनही तो सापडला नाही, म्हणून कर्मचाऱ्यांनी आयुक्तांना माहिती दिली. महापालिकेतील प्राणी कल्याण अधिकारी डॉ. हरपाल सिंग हे त्यांच्या पथकासह रात्री बारा वाजण्याच्या सुमारास आयुक्तांच्या निवासस्थानी पोहोचले. दोन वर्षांच्या इकोचा फोटो घेतला आणि कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन शोध सुरू केला.
रविवारी रात्री तीन वाजेपर्यंत सिव्हिल लाइन पोलिस ठाणे आणि महापालिकेच्या पथकाने आयुक्तांच्या निवासस्थानाभोवती असलेल्या वसाहतींमध्ये इकोचा शोध घेतला, मात्र काहीच हाती लागले नाही. त्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून पुन्हा एकदा टीमने इकोच्या शोधासाठी घरोघरी जाऊन मोहीम सुरू केली. अखेर रात्रीच्या सुमारास इको सापडला. त्यामुळे प्रशासन आणि मनपाला दिलासा मिळाला. यासंदर्भात आयुक्त सेल्वा कुमारी जे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, कुत्रा स्वतःहून गेला आणि स्वतःहून परतला.
हिमाच्छादित भागात
प्राणी कल्याण अधिकाऱ्याने सांगितले की, सायबेरियन हस्की जातीचे कुत्रे बहुतेकदा बर्फाळ भागात आढळतात. या प्रजातीचे कुत्रे कुटुंबातील सदस्यांशी अधिक संलग्न असतात. ते दिसायला सुंदर असतात, त्यांची वास घेण्याची क्षमताही जास्त असते. असे नोंदवले गेले आहे की ते बर्फाच्छादित भागात अडकलेल्या लोकांना वास घेऊन शोधण्यात सर्वात जास्त मदत करतात. अलिकडच्या वर्षांत, या प्रजातीच्या कुत्र्यांची पैदास करण्याची प्रथा देशात वाढली आहे.
टीकेची झोड
आयुक्तांचा कुत्रा हरवला म्हणून सर्व यंत्रणा अशी कामाला लागली. जेव्हा सर्वसामान्यांचे काहीही हरवते तेव्हा सरकारी यंत्रणा ढीम्म असते. आयुक्तांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आयुक्त सेल्वा यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तसेच, सोशल मिडियात या प्रकरणावरुन प्रशासनावर चांगलीच टीका होत आहे.