इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन सर्वांनी करावे. कायदे-नियमांचे उल्लंघन करू नये, अशी शिकवण न्यायपालिका, न्यायाधीश देत असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील लखनौ येथे एका न्यायाधीशाच्या मुलाची कार नो पार्किंग झोनमधून उचलण्याची कारवाई पोलिसांना करावी लागली आहे. मुख्य म्हणजे कार नो पार्किंग झोनमध्ये ठेवल्याची चूक कबूल करण्याऐवजी न्यायाधीशाच्या मुलाने पोलिसांसोबत गैरवर्तन केल्याची माहिती आहे. या घटनेने कायद्याचे ज्ञान देणाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यंच असे वागत असतील तर इतरांनी काय बोध घ्यावा, असा प्रश्न निर्माण केल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, न्यायाधीशाच्या मुलाने कर्मचाऱ्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. यासोबतच पोलिस ठाण्यात गेल्यावर मारण्याची धमकीही दिली. ‘पोलिस ठाण्यात मार खाशील तेव्हा कार सोडशील,’ असे त्या मुलाने कर्मचाऱ्याला म्हटले. पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार हजरतगंज येथील नो पार्किंग झोनमध्ये उभी होती. क्रेनमधून गाडी उचलण्यापूर्वी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यांनी घोषणा केली की,‘ज्याची गाडी नो पार्किंगमध्ये उभी असेल, त्याने येथून न्यावी, अन्यथा क्रेनद्वारे टो करण्यात येईल.’ दोन मिनिटे वाहतूक पोलिसांनी घोषणा केली. मात्र, वाहनमालक घटनास्थळी न आल्याने वाहतूक पोलिसांनी गाडी क्रेनच्या साह्याने टो करून यार्डात नेली.
गाडी जागेवर नसल्याचे पाहून कार चालकाने आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. लोकांनी सांगितले की ट्रॅफिक पोलिसांनी कार नो पार्किंग झोनमधून नेली आहे. ट्रॅफिक बूथ यार्डमध्ये न्यायाधीशांच्या मुलाने कर्मचाऱ्यांना ओळख दाखवून गोंधळ घातला आणि गाडीवर काय लिहिले आहे ते वाचण्यास सांगितले. मोठमोठ्याने ओरडू लागला. कार लगेचच जॅमरपासून मुक्त करून ताब्यात द्या, असे सांगितले. असे केले नाही तर पोलिस ठाण्यात नेऊन मारेन असेही म्हटले.
अखेर भरला दंड
स्वत:ची चूक असतानाही न्यायाधीशाच्या मुलाने पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्यांचे बराच वेळ वाद चालल्यानंतर मुलाने ११०० रुपये दंड भरला. त्यानंतरच त्याची गाडी परत देण्यात आली. हे वाहन मेरठमधील न्यायाधीशांच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात येत आहे.
UP Luknow Judge Son Car No Parking Towing Traffic Police