इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. खून, हाणामारी, आत्महत्या, बलात्कार यासारखे प्रकार सर्रास घडत आहेत. विशेषतः कौटुंबिक वादातून एकमेकांवर हल्ले करणे, नातेवाईकांना ठार मारणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. विवाहासारखा आनंदाचा उत्सव घरात असताना एक भयानक घटना घडली आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेव-नवरीसह घरातील ५ जणांची हत्या करण्यात आली आहे. घरातीलच सदस्याने हे सर्व केले असून त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे मैनपुरी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या
शिववीर नावाचा तरूण नोएडामध्ये कॉम्प्युटर प्रशिक्षण केंद्र चालवतो. त्याचा लहान भाऊ सोनूचे गावाकडे लग्न असल्याने सर्वजण गावी जमले होते. अन्य नातेवाईकही घरी आलेले होते. इटावा येथे लग्न समारंभ थाटात पार पडला. त्यानंतर नववाहित दाम्पत्याची वरात गावी आली. रात्री सुमारे ११ वाजेवर्यंत नाचगाण्याचा कार्यक्रम रंगला होता. यानंतर सर्वजण झोपी गेले. सर्व गाढ झोपेत असताना शिववीरने डाव साधला. रागाच्या भरात तो छतावर गेला. तेथे त्याने नवविवाहित दाम्पत्य सोनू आणि त्याच्या पत्नीची धारधार शस्त्राचा वार करून हत्या केली. यानंतर खाली येत त्याने लहान भाऊ, त्याचा मित्र आणि वहिनीची हत्या केली. यानंतर त्याने त्याची पत्नी डॉली आणि वडील सुभाषचंद्र यांच्यावरही हल्ला केला, परंतु ते जखमी झाले. सर्वजण झोपेत असताना रात्री तीन वाजता ही वाईट घटना घडली.
स्वतः केली आत्महत्या
लग्न घरात रात्री तीन वाजता एका तरुणाने त्याच्या कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केली. यानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. मृतांमध्ये नवरदेव आणि नवरीचाही समावेश आहे. अचानक झालेल्या या हल्ल्याने घरातील अन्य सदस्य व नातेवाईक देखील जागे झाले. घरातील हे भयानक दृश्य बघून सर्वच घाबरले आणि रडू लागले. त्यांचे रडणे व आरडाओरडा ऐकून जागे झालेल्या अन्य नातेवाईकांनी व परिसरातील रहिवाशांनी शिववीरला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतू, तो तिथून निसटला आणि घराच्या मागे गेला. तिथे त्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. अचानक झालेल्या एवढ्या मोठ्या हत्याकांडाचे कारण पोलिसांसह अद्याप कोणालाच समजले नाही. मात्र या प्रकरणाची सर्वत्र जोरदार चर्च सुरू आहे.
कोल्ड ड्रिंकमध्ये नशेची गोळी
नवीन सून सोनी (वय २०) हिच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण होते. शुक्रवारी रात्री एक वाजेपर्यंत सर्वजण डीजे वाजवून गाणे-नाचत होते. रात्री शिववीरने कोल्ड्रिंकमध्ये नशेची गोळी मिसळून सर्वांना दिली. सर्वजण बेशुद्ध पडल्यानंतर शिववीरने बांके येथून अंगणात झोपलेला भाऊ भुल्लन (२०), मेहुणा सौरभ रा. चंदा हविलिया (२६), भावाचा मित्र दीपक (२०) फिरोजाबाद यांचा खून केला.
वधूला देखील कापून टाकले
टेरेसवर झोपलेल्या सोनू (२२) आणि नवविवाहित सोनी यांचा शिववीरने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. या हल्ल्यात आरोपीचे वडील सुभाष, पत्नी आणि मावशी गंभीर जखमी झाले आहेत. पाच खून केल्यानंतर शिववीरने घरापासून काही अंतरावर जाऊन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.
जखमींना रुग्णालयात दाखल केले
या हत्याकांडाची माहिती मिळताच एसपी विनोद कुमार आणि अनेक पोलिस ठाण्यांचा फौजफाटा गावात पोहोचला. दोन जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. ही हत्या का करण्यात आली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.