इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेश हे अशक्य गोष्टी शक्य करून दाखविणारे राज्य आहे. न्यायलय असो, सरकारी कार्यालय असो वा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातील घटना असो. इथे काहीही शक्य आहे, असे उगाच म्हटले जात नाही. आता तर एका ८३ वर्षांच्या म्हाताऱ्याला त्याने ३० वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यासाठी अटक वॉरंट बजावण्यात आले आहे.
अचहान असे या ८३ वर्षीय वयोवृद्ध माणसाचे नाव असून तो उत्तर प्रदेश परिवहन मंडळात बसचालक होता. १९९३-९४मध्ये अचहान लखनऊहून कैसरबागमार्गे बरेलीला जाणारी सरकारी बस चालवत होता. तेव्हा फरीदपूरमधून जात असताना त्याच्या बसने रस्त्यावरील एका म्हशीला धडक दिली. त्यानंतर त्या म्हशीच्या मालकाने अचहानविरोधात तक्रार दाखल केली होती. अचहानविरोधात रॅश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याची बसही जप्त करण्यात आली. परंतु नंतर काही वेळाने त्याला सोडण्यात आले. पुढच्या काळात या प्रकरणाचा विषय आला नाही आणि त्यावर कारवाई सुद्धा झाली नाही.
एवढेच नाही तर तो निवृत्तीपर्यंत सेवेत कायम होता. एवढ्या वर्षांनंतर आत्ता पोलिसांचा एक ताफा अचहानच्या घरी आला. कुटुंबातील सारे लोक थबकून गेले. त्यांना काय झाले कळेचना. अर्धांगवायूमुळे खाटेवर पडलेल्या अचहानच्या हाती पोलिसांनी वॉरंट ठेवला. त्याने तो वाचला आणि डोळ्यात पाणीच आले. एवढी वर्षे सेवा केल्यानंतर आता म्हातारणी हा दिवस बघायला मिळेल याची कल्पनाही केली नव्हती, या शब्दांत अचहान यांनी खंत व्यक्त केली.
नाहीतर अटक होणार
अचहान यांना १७ जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ते हजर झाले नाही तर अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. अचहान यांच्या वकिलाने प्रकरण हाती घेतले असून ते १७ जुलैला न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती दिली आहे.