इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशातील आग्रा येथे व्यापारी महिलेच्या हत्येप्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेनंतर महिलेची मुलगी फरार आहे. तसेच हत्येनंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला असता प्रखर आणि अंजलीच्या अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेल्या मुलीचा प्रियकर प्रखर गुप्ता याने पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. मुलीने आपल्या आईच्या हत्येचा कट कसा रचला असे त्याने सांगितले आहे.
पैशाचे आमिष दाखवून
आपल्या मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे व्यापारी अंजली बजाज आणि त्यांच्या पतीलाही कळले. याच कारणावरून पालकांनी मुलीला प्रखरला भेटण्यास मनाई केली होती. अशा परिस्थितीत मुलीने प्रियकराशी गुप्त चर्चा करून आपल्या जन्मदात्या आईचा काटा काढण्याचा भयंकर डाव रचला. त्यानंतर प्रखर याने गंजदुंडवारा येथील आपल्या ओळखीच्या सहकाऱ्याला पैशाचे आमिष दाखवून कटात सहभागी केले होते. मात्र प्रखर, त्याचा मित्र शिलू आणि अंजलीच्या मुलीने ठरल्यानुसार आई आणि वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावले. जिथे संधी मिळताच प्रखर आणि शीलूने मुलीच्या आईचा खून केला. यानंतर मृतदेह जागीच टाकून ते पळून गेले. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
चाकू व दुचाकी जप्त…
अंजलीची मुलगी शास्त्रीपुरमहून बाजारात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली होती. बराच वेळ घरी न परतल्याने आईने शोधाशोध सुरू केली. काही वेळाने मुलीचा आईला निरोप आला की, मला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात ये. दरम्यान मुलीने वडिलांना फोनवर दुसऱ्या ठिकाणी बोलावले. यावर ते पत्नीला मंदिरात सोडून तिथे गेले. त्यानंतर मुलीने वडिलांना फोन करून घरी पोहोचल्याची माहिती दिली. यानंतर पती उदित पत्नीला घेण्यासाठी वनखंडी महादेव मंदिरात पोहोचला मात्र ती तेथे आढळली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिस ठाणे गाठून हरवल्याची तक्रार दाखल केली.
यावर पोलिसांनी शोध सुरू केला आणि रात्री उशिरा ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह जंगलात पडल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिस तेथे पोहोचले आणि मृतदेह अंजलीचा असल्याचे समजले. तसेच आरोपीच्या सांगण्यावरून या घटनेतील एक चाकू व रक्ताने माखलेला टॉवेल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक दुचाकीही जप्त केली आहे.
UP Crime Agra Daughter Murder Mother