इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशात काहीही शक्य आहे, असे आपण म्हणतो. भर रस्त्यात सर्वसामान्य माणसाच्या छातीवर गोळ्या झाडण्यापासून तर पोलिसांच्या सुरक्षेत असलेल्या माफियावर गोळ्या झाडण्यापर्यंत सारेकाही इथे घडले आहे. योगी सरकार आल्यापासून तर दररोज नवीन काहीतरी कानावर पडत आहे.
काही दिवसांपूर्वी माफिया अतिक अहमद आणि त्याच्या भावाला अज्ञात गुंडांनी भर रस्त्यात गोळ्या झाडून ठार केले होते. त्यानंतर योगी सरकारने अतिक अहमद याच्या संपत्तीवर छापेमारी करून ताब्यात घेतल्या आहेत. यातीलच एका जागेचा योगी सरकारने असा काही वापर केला आहे की, त्याचे देशभर कौतुक होत आहे. तसेच इतर राज्यांनाही यापासून काहीतरी धडा घेण्याची गरज असल्याचे सोशल मिडियावर बोलले जात आहे.
उत्तर प्रदेशात एकेकाळी माफियांकडून गरिबांच्या जागेवर अतिक्रमण होत असे. गरिबांना बेदखल करून त्यांच्या जागेवर माफिया ठाण मांडून बसलेले असायचे. मात्र आता योगी सरकारने माफियाच्या जागेवर गरिबांसाठी घरे बांधून सर्वांचे लक्ष वेधले आहे. या जागेवर उत्तम असे फ्लॅट्स गरिबांसाठी बांधण्यात आले असून संपूर्ण बिल्डींगला भगवा रंग देण्यात आला आहे. प्रयागराज विकास प्राधिकरणाच्या वतीने संगम नगरी येथे ही योजना राबविण्यात आली आहे.
लवकरच या घरांच्या चाव्या गरिब कुटुंबांना देण्यात येणार आहेत. अतिकची ११६९ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यातील ७५२ कोटींच्या मालमत्तेवर बुलडोझर चालविण्यात आला असून उर्वरित मालमत्ता सरकारच्या ताब्यात आहे. लुकरगंजच्या एका जागेवरील अतिक्रमण हटवून सरकारने गरिबांसाठी सदनिका बांधण्याचा निर्णय घेतला.
लॉटरीद्वारे फ्लॅट
प्रयागराज विकास प्राधिकरणाच्या वतीने लॉटरीद्वारे फ्लॅटचे वाटप करण्यात येणार आहे. १ हजार ७३१ चौरस मीटर जागेवर ७६ फ्लॅट्स बांधण्यात आले आहेत. यासाठी ६ हजार लोकांनी अर्ज केले आहेत, हे विशेष.
चार मजली इमारत
लाभार्थ्यांना सहा लाखांमध्ये फ्लॅट मिळेल. यातील दिड लाख केंद्र व एक लाख राज्य सरकारकडून अनुदान मिळेल. त्यामुळे लाभार्थ्यांना फक्त साडेतीन लाख रुपयांत घर पडणार आहे. ही चार मजली इमारत पूर्णपणे सोलरवर असणार आहे. तर पार्किंग, कम्युनिटी हॉलची सुविधाही असणार आहे.
UP CM Yogi Adityanath Mafia Home Land