इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार उत्तरप्रदेशमधील लोकांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणत आहे. आता आणखी एका योजनेची घोषणा योगींनी केली आहे. त्याअंतर्गत मुंबई औद्योगिक महानगरात राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांच्या मदतीसाठी यूपी सरकारचे कार्यालय मुंबईत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा मुंबईत राहणाऱ्या यूपीच्या लोकांना होणार आहे. नुकतीच याविषयीची घोषणा योगींनी केली आहे.
उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांसाठी आपले कार्यालय उघडणार आहे. हे कार्यालय मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशच्या लोकांच्या नोकऱ्या, व्यवसाय आणि सोयी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करेल. मुंबईची लोकसंख्या सुमारे १.८४ कोटी आहे, त्यापैकी ५० ते ६० लाख लोकं उत्तर भारतातील आहेत आणि त्यापैकी बहुतेक उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. उद्योग, सेवा क्षेत्र, किरकोळ व्यापार, वाहतूक, खाद्य व्यवसाय, कारखाना किंवा मिल अशा अनेक क्षेत्रात उत्तर प्रदेशच्या लोकांनी मुंबईत नोकऱ्या मिळवल्या आहेत.
महाराष्ट्रात परप्रांतियांच्या वाढत्या संख्येवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी अनेकदा आक्षेप घेतला आहे. कठोर भूमिका घेतली आहे. अशात उत्तर भारतीयांना प्रोत्साहन देण्यासाठी योगी आदित्यनाथांनी थेट कार्यालय सुरु करण्याची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय, राज ठाकरेंना उत्तर प्रदेशमध्ये येऊ देणार नाही अशी भूमिका तेथील स्थानिकांनी घेतली आहे. त्यामुळे योगींनी मुंबईत कार्यालय सुरु करण्याची घोषणा केल्यानंतर राज्यातील नेत्यांच्या, राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या कार्यालय सुरु करण्याच्या निर्णयामुळे उत्तर प्रदेशवासियांना, जे मुंबईत राहतात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.