इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या दहा वर्षांपासून पत्नीच्या छळाचा सामना करणाऱ्या बरेलीच्या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांना त्याने जबाबदार धरले आहे. यासंदर्भात त्याने सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्याने सर्व काही सांगून टाकले आहे. पोलिसांनी ही नोट ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे.
विक्की उर्फ विनय (३०) हा असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचा छोटासा व्यवसाय होता. दहा वर्षांपूर्वी त्याने शेजारच्या मुलीसोबत प्रेमविवाह व कोर्ट मॅरेज केले होते. या दाम्पत्याला ओम नावाचा आठ वर्षांचा मुलगा आहे. रविवारी मध्यरात्री विकीने टेरेसच्या खोलीत पत्नीच्या ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दरवाजा तोडला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट आणि खोलीतून दारूची एक बॉटल सापडली आहे.
विकीचा भाऊ कपिलने सांगितले की, लग्नाच्या काही वर्षानंतर पत्नी घटस्फोटाची मागणी करत होती. त्यामुळे विक्की त्रस्त आणि तणावात असायचा. काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणानंतर विक्कीच्या पत्नीने बारादरी पोलीस ठाण्यात पती व त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. तसेच, ती माहेरच्या घरी राहत होती. रविवारी सायंकाळी विकी तिला फोन केला. तिने उचलला नाही. तो भेटण्यासाठी गेला असता ती आलीच नाही. मेव्हण्याने विकीला शिवीगाळ करून घराबाहेर हाकलून दिल्याचा आरोप आहे. घरी पोहोचल्यावर विकी संतापला. दरम्यान, रात्री त्याची पत्नी पोलिसांसह विकीच्या घरी आली. पोलिसांनी विक्कीला बेदम मारहाण केली, त्याच्या वडिलांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्याशीही गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. पत्नीशी भांडण करण्यासाठी सासरच्या घरी जाऊ नका, अशा सूचना देऊन पोलिस निघून गेले. त्यानंतर विकीने त्याच्या खोलीचा दरवाजा बंद केला.
सुसाईड नोट
सुसाईड नोट विकीने लिहिले आहे की, माझ्या मृत्यूचे कारण माझी पत्नी आणि तिचे कुटुंबीय आहेत, मी अनेकदा फोन करूनही ती आली नाही. माझ्या लग्नाला दहा वर्षे झाली आहेत. दहा वर्षांत भांडण करून पत्नी दहा वेळा माहेरी गेली आहे, तिला बोलावण्यासाठी गेले असता मेव्हण्याने माझ्याशी गैरवर्तन केले. वडील आणि मित्र पिंटूशिवाय माझ्या मृतदेहाला कोणी हात लावणार नाही. माझ्या जीन्स पँटमध्ये पैसे ठेवले आहेत. त्यामधून माझे अंत्यसंस्कार करावेत.
पत्नीची प्रतिक्रीया
विकीच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची पत्नी सासरच्या घरी आणि नंतर पोस्टमार्टम हाउसमध्ये आली. ती रडत होती. मीडियाने तिला विचारले असता तिने सुरुवातीला काहीच सांगितले नाही. त्यानंतर पती दारू पिऊन भांडण करायचा म्हणून मी माहेरी गेली होती, असे सांगितले. काल पुन्हा नवऱ्याने भांडण केले. मला माहीत नव्हते की अशी परिस्थिती येईल. तो आत्महत्या करेल.