इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत असेल आणि ती भ्रष्टाचारी असेल तर त्याचा जेवढा लाभ घेता येईल तेवढा घेतला जातो. पण त्याची तक्रार करण्याचे औदार्य कुणीच दाखवत नाही. उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये मात्र चक्क एका नवऱ्यानेच त्याची बायको भ्रष्टाचारी असल्याची तक्रार केली आहे.
बरेली येथे प्रांतीय नागरी सेवा अधिकारी ज्योती मौर्य यांच्या विरोधात त्यांचे पती आलोक मौर्य यांनीच तक्रार केली आहे. पतीने मौन तोडून पोलिसांत तक्रार दिल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण, तसे करण्यामागचे मुळ कारण वेगळेच आहे. खरे तर आलोक हे ज्योती यांच्या त्रासाने कंटाळलेले आहेत. त्यांचे लग्न २०१० मध्ये झाले होते. त्यानंतर त्यांनी पत्नीला तिच्या इच्छेप्रमाणे शिकू दिले आणि नंतर नोकरीसाठीही प्रोत्साहन दिले. २०२० नंतर आतापर्यंत ज्योती सातत्याने वसुलीसाठी ओळखल्या जात आहेत. त्यांच्याविरोधात अनेकांनी आवाज उठवला पण आजपर्यंत त्यांचे कुणीही वाकडे करू शकले नाही.
अश्यात त्यांच्या पतीने ज्योती यांच्या वसुलीचा संपूर्ण लेखाजोखाच पोलिसांपुढे मांडला. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. माझी पत्नी दररोज मोठ्या प्रमाणात वसुली करते आणि दर महिन्याला लाखो रुपये वसुलीतून कमावते, असा थेट आरोप त्याने केला आहे. त्यासाठी त्याने पोलिसांकडे काही पुरावेही सादर केले आहेत. आता त्या पुराव्यांची सत्यता पडताळून बघण्यात येईल आणि त्यानंतर ज्योती मौर्य यांच्यावर काय कारवाई होते, हे बघण्याची उत्सुकता असेल.
पत्नीचे विवाहबाह्य संबंध
ज्योती मौर्य यांचे गाझियाबाद येथील होमगार्ड अधिकाऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप पतीने केला आहे. यावरून आमच्यात अनेकदा खटके उडाले, पण प्रत्येकवेळी ती जीवे मारण्याची धमकी देते असे त्याने म्हटले आहे. एकदा हॉटेलमध्ये दोघांना रंगेहाथ पकडले, पण तिथेही दोघांनी हल्ला केला. मात्र जीव वाचवून पळण्यात यशस्वी झालो, असेही त्याने म्हटले आहे. दोघांमधील अश्लील चॅटिंगचे स्क्रीनशॉट आलोक यांनी होमगार्ड कार्यालयात तक्रारीसोबत जोडले आहेत.
ज्योती मौर्य यांची डायरी
आलोक यांनी बरेली पोलिसांत तक्रार देताना त्यासोबत ज्योती यांची डायरी पुराव्यादाखल जोडली आहे. यामध्ये दररोज कुणाकडून किती पैसे वसुल करायचे आहेत आणि किती वसुली झाली आहे, याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. पोलीस आता डायरीच्या आधाराने ज्योती मौर्य यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडण्याच्या तयारीत आहेत.