नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाकिस्तानातून आपल्या चार मुलांसह प्रेमासाठी अवैधरित्या भारतात दाखल झाल्याचा दावा करणारी सीमा हैदर हिने कुठल्याही परिस्थितीत भारत सोडणार नसल्याचे म्हटले आहे. शुक्रवारी तिने पत्रकारांशी बोलताना आपण माहेरी अर्थात पाकिस्तानात जाणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे. अर्थात हे सीमा हैदर हिच्या हातात नसून ते भारतच ठरविणार आहे, हा भाग निराळा.
एक महिला चार लहान मुलांसोबत पाकिस्तानातून नेपाळमध्ये जाते आणि नेपाळमधून अवैधरित्या भारतात येते. इथे आल्यानंतर ती आपल्या प्रियकराला भेटते, त्याच्यासोबत राहू लागते आणि नंतर काही दिवसांनी एक वकील पोलिसांना कळवतो म्हणून सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी होते. सीमा हैदरचे भारतात अवैधरित्या दाखल होणे ही बाब भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. सचिन मिणा आणि सीमा हैदर लग्नासाठी एका वकिलाला भेटले नसते आणि त्या वकिलाने पोलिसांना कळविले नसते तर सीमा हैदरचे वास्तव पोलिसांना कळलेच नसते.
आता सीमाची एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे आणि त्यात अनेक खळबळजनक खुलासेही होत आहे. यापूर्वी तिने भारतीय सैन्यातील जवानांना फेसबूकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठविले, एका दिवसात पासपोर्ट तयार करणे अशा अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. आता तिने भारतातील तुरंगात राहायची वेळ आली तर राहीन, पण पाकिस्तानात जाणार नाही, असे म्हटले आहे. मात्र त्याचा निर्णय इमिग्रेशन विभाग घेणार आहे. अवैधरित्या देशात दाखल झालेल्या नागरिकांची ओळख पटविणे आणि त्यांना मायदेशी पाठविणे याचा निर्णय हा विभाग घेत असतो. या संपूर्ण प्रक्रियेसाठी तीन महिन्यांचा कालावधी देखील लागू शकतो.
पाकिस्तान तिला सोडणार नाही
सीमा हैदर हिला भारताकडून तिच्या मायदेशी पाठविले जाईल किंवा पाच ते सात वर्षांचा कारावास होईल. पण पाकिस्तानात गेल्यास तिला सहज घरी जाऊ दिले जाणार नाही. त्याठिकाणी तिच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
पाकिस्तानातही कुंकू लावायचे
मला भारताचा व्हिसा मिळाला नव्हता. त्यामुळे सचिनसाठी मी ओळख लपवून भारतात आले. हे सारे मी प्रेमासाठी केले. मी दोन वर्षांपासून सचिनला आपला पती मानत आहे आणि पाकिस्तानात असतानाही त्याच्या नावाचे कुंकू लावायचे, असे सीमा हैदरने पत्रकारांना सांगितले. एवढेच नाही तर सचिनसाठी दोन वर्षांपासून करवा चौथचे व्रत करत होते, असा दावाही तिने केला आहे.