नाशिक – उत्तर प्रदेशातील नोएडा येथील धर्मांतरण प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नाशिकरोडच्या आनंद नगरमधील एका युवकाला याप्रकरणी अटक केली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसही सतर्क झाले आहेत.
नाशिकरोड परिसरातील आनंद नगर या भागात एक युवक राहत होता. स्वतःला तो कुणाल चौधरी असल्याचे सांगत होता. मात्र, त्याचे खरे नाव आतिफ असल्याचे पुढे आले आहे. याच युवकाला उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने अटक केली आहे. जून महिन्यात नोएडामध्ये घडलेल्या धर्मांतर प्रकरणात अतिफचा समावेश असल्याचा संशय आहे. या आधारेच त्याला अटक करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आतिफ उर्फ कुणाल याच्या बँक खात्यामध्ये परदेशातील विविध खात्यांमधून पैसे जमा झाल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे ही एकूण रक्कम तब्बल २० कोटी रुपये असल्याचे तपासात उघड झाले आहे. संशयित आतिफसह इतर दोन जणांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक करण्यात आले आहे. मूक बधीर व्यक्तींचे बळजबरी धर्मांतर करून घेणे आणि देशविरोधी कारवाया करण्यास त्यांना प्रवृत्त करणे हा त्यांचा प्रामुख्याने उद्देश असल्याचे यापूर्वीच पुढे आले आहे.
नोएडामध्ये घडलेल्या घटनेचे कनेक्शन नाशिकमध्ये आल्याने याबाबतच्या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत जातील हे बघणे देखील महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे नाशिक पोलिसही सतर्क झाले आहेत. उत्तर प्रदेश एटीएसने एकूण ३ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात एक जण नाशिकचा तर मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) तेथील मोहम्मद शरीफ कुरैशी, मोहम्मद इदरीस यांचा समावेश आहहे. आसिफच्या अटकेबाबत नाशिक पोलीस अनभिज्ञ असून उत्तर प्रदेशात ही कारवाई झालेली असल्याने स्थानिक यंत्रणा सतर्क झाली आहे. याप्रकरणी पुढे काय खुलासा होतो, तापासात काय निष्पन्न होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.