विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
भारतीय लोकशाहीत निवडणूका ही अत्यावश्यक बाब मानली जाते. कारण भारतीय नागरिकांना मतदानाद्वारे आपले लोकप्रतिनिधी निवडण्याचा हक्क मिळालेला आहे. सहाजिकच वर्षभरात संसदेपासून ते स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायती पर्यंत कोणत्या ना कोणत्या निवडणुका होतच असतात. काही महिन्यांपूर्वीच देशातील पश्चिम बंगाल, केरळ सह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून पुढील वर्षांच्या प्रारंभीच उत्तर प्रदेश, पंजाब सर्व पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका संबंधी सर्वेक्षण सुरू केले असून उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपचे म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे सरकार येण्याची शक्यता एका निष्कर्ष द्वारे काढण्यात आली आहे.
पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका होणार आहेत. ‘एबीपी-सी ‘ ने लोकांचा कल जाणून घेण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे निकालानुसार भाजपला पुन्हा उत्तर प्रदेशात सत्ता मिळू शकते. तसेच राज्यातील लोकांचा मुख्यमंत्री योगी यांच्यावर विश्वास आहे. मात्र, जागांची संख्या थोडी कमी होण्याची शक्यता दिसते. दरम्यान केंद्रात परत सत्तेत येण्यासाठी भाजपला उत्तर प्रदेश राज्य जिंकणे आवश्यक आहे. कारण या राज्यात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. तर दुसरीकडे एका सर्वेक्षणानुसार भाजपला विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात सुमारे सुमारे २६४ जागा मिळू शकतात, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला सुमारे ११४ जागा मिळतील असे वाटते. बसपाला १४ जागा, काँग्रेसला ५ जागा आणि इतरांना ८ जागा मिळू शकतात.
या सर्वेक्षणाचा मागच्या वेळी तुलनेत विचार केला तर, तोटे आणि फायद्यांच्या गणितानुसार भाजप सुमारे ६३ जागा गमावू शकतो तर यावेळी समाजवादी पक्षाला समान जागांचा फायदा होताना दिसत आहे. तसेच बसपाला पाच आणि काँग्रेसला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीचा विचार केला तर विशेष म्हणजे मतांच्या हिशेबाने, भाजप युतीला सुमारे ४२ टक्के, समाजवादी पार्टी आघाडीला ३० टक्के, बहुजन समाज पार्टीला १६ टक्के, काँग्रेसला ५ टक्के आणि इतरांना ७ टक्के मतांचा वाटा मिळू शकतो.