फर्रुखाबाद (उत्तर प्रदेश) – येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून बुधवारी दुपारी कॅशिअर काउंटरवरून चार लाख ४० हजार ८७० रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. कॅशिअर जेवणासाठी गेले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता दोन संशयित युवक बँकेत दिसले असून, त्यांची माहिती पोलिस घेत आहेत. एसबीआयच्या शाखेतील कनिष्ठ सहाय्यक ऋषभ कटियार दुपारी जेवणासाठी शेजारील खोलीत गेले होते. त्यांच्या काउंटर लॉकमध्ये चावी फसली होती. त्यामुळे ते कुलूप लावू शकले नाही. हीच संधी साधून संशयितांनी रोकडवर हात साफ केला. वीस मिनिटांनंतर ते केबिनमध्ये परतल्यानंतर पैसे नसल्याचे आढळल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
त्यांनी लेखापाल अलोक कुमार शुक्ला यांना घटनेची माहिती दिली. व्यवस्थापक रजेवर होते. आलोक यांनी व्यवस्थापकांना कळविले. संपूर्ण प्रकरणाची माहिती कोतवाली पोलिसांना दिली. यादरम्यान सीसीटीव्ही कँमे-याची तपासणी करण्यात आली. कनिष्ठ सहाय्यकाच्या आरोपानुसार, दोन संशयित युवक मास्क लावून बँकेत घुसताना दिसले. बँकेतून बाहेर पडताना त्यांच्याजवळ लाल रंगाची पिशवी होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.