विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
एकीकडे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळत असताना उत्तर भारतात विशेषत : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये नद्यांना महापूर आले असून सखल भागातील नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने हाहाकार उडाला आहे. उत्तर प्रदेशात दोन धरणे फुटली असून नुकसानग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचावकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासात संततधार पाऊस सुरू असल्याने कानपूर, गोरखपूर-बस्ती विभागात पुराचा कहर सुरूच आहे. राप्ती, रोहिन, शरयू या नद्या धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. अत्यंत धोकादायक बाब म्हणजे महाराजगंज मधील रोहिन नदीच्या बंधाऱ्याला तडा गेल्याने पूर पाणी लगतच्या गावात शिरले असून नदीकाठच्या गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. खेड्यापाड्यातील लोक सुरक्षित निवारा शोधताना धाव घेत असून अनेक गावे पूराने वेढलेली आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत आणि बचावकार्य सुरु आहे शेतकऱ्यांची हजारो एकरांवरील उभी पिके उद्ध्वस्त झाली आहेत. लहान-मोठी शहरे तसेच ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे एनडीआरएफच्या पथकासह सुमारे २०० बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
महाराजगंज जिल्ह्यातील लक्ष्मीपूर आणि मजहर परिसरातील रोहिन नदीवरील गौहरपूर धरण फुटले असून पानियारा परिसरातील रोहिन नदीच्या डोमरा जरडी धरणाला देखील गळती लागली. त्यामुळे परिसरातील गावांमध्ये खळबळ उडाली असून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.एनडीआरएफच्या टीमने बचावकार्य सुरू केले असून आपद्ग्रस्त लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले. दरम्यान आज सोमवारी पाणी बाल्मीकीनगर बंधाऱ्यातून गंडक नदीत पूर पाणी सोडण्यात आले आहे. तर दुसरीकडे राप्ती नदीची पाण्याची पातळी वाढली आहे, कारण धानी परिसरातील रिगौली धरणातून पूर पाणी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनत चालली आहे. सर्व नद्या धोक्याचा ओलांडून हाहाकार उडवला आहेत. गेल्या दोन दिवसांपासून नवीन गावे आणि रस्ते बुडवत आहेत. चनारैया-कुकुरभुक्वा धरणातील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन जमुवार या जिल्हा मुख्यालयालाही धोका निर्माण झाला आहे. कुशीनगरमधील बडी गंडक नदीच्या पाण्याची पातळी गेल्या ३ दिवसांपासून सारखी वाढत आहे.
रविवारी रात्री उशिरापर्यंत पाण्याची पातळी वाढली असून वाल्मिकी गंडक बंधाऱ्यातून ५ लाख क्युसेक्सपेक्षा जास्त पाणी सोडल्याची माहिती मिळाली, जिल्हा प्रशासनाने दिली. दुसरीकडे, शरयू नदी बरहाजभागामध्ये धोक्याच्या वर वाहत आहे. उत्तर प्रदेशातील महापुरामुळे सर्वत्र हाहाकार उडाला असताना नेमकी किती जीवित हानी झाली तसेच किती हेक्टर पिकांचे नुकसान झाले याची नेमकी आकडेवारी मात्र अद्याप प्राप्त होऊ शकली नाही. कारण प्रशासनाकडून वेगळी माहिती देण्यात येत आहे.