माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ
मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रात आजपासून गुरुवार ९ मार्चपर्यंत गडगडाट, वाऱ्यासहित अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. मात्र त्याचबरोबर मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात आज व उद्या (६ व ७ मार्च) काही ठिकाणी किरकोळ गारपिटीचीही शक्यताही नाकारता येत नाही.
आजपासून बुधवार दि. ८ मार्चपर्यंतच्या ३ दिवस महाराष्ट्रात दुपारच्या कमाल तापमानात २ डिग्रीने घसरण होऊन उष्णतेची काहिली तेथे काहीशी कमी जाणवेल, असे वाटते.
पश्चिमी झंजावात पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत आहे. जमिनीपासून अंदाजे ६ किमी उंचीवर अलिबाग किनारपट्टी समोर अरबी समुद्रात हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. तो दक्षिणोत्तर आस आहे. त्याच्या परिणामामुळे राजस्थानातील बन्सवाडा, प्रतापगड, उदयपूर, चितोडगड जिल्ह्यादरम्यानच्या क्षेत्रावर जमिनीपासून ९०० मीटरपर्यन्त चक्रीय वारा तयार झाला आहे. हा वारा घड्याळ काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतो आहे.
मध्य छत्तीसगड ते दक्षिण कोकण पर्यन्तच्या रायपूर, चंद्रपूर नांदेड ते कणकवली सिंधुदुर्ग पर्यन्त त्याचा परिणाम जाणवेल. जमिनीपासून अंदाजे ९०० मीटरवरून जाणारा हवेचा कमी दाब क्षेत्राचा आस (ट्रफ) यामुळे वातावरणात मोठा बदल जाणवेल.
आज इतकेच. वातावरणात काही बदल झाल्यास लगेचच लिहिले जाईल.
वरील विवेचन हे केवळ हवामान साक्षरतेसाठीच समजावे, ही विनंती.
साक्रीत गारपीट
आज नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर, साक्री तालुक्याच्या काही भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेत पिकांनाही या अवकाळीने दणका दिला आहे.
https://twitter.com/Hosalikar_KS/status/1632695107211100162?s=20
Unseasonal Rainfall Hailstorm Climate Forecast