अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…
शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे….
मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे. मात्र 15 ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित आहे. या तारखेपासून किमान 18 ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आभाळी हवामान आणि दुपार नंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे.
सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वात अधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकतं, जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये आभाळी हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
राज्यात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित करून आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज आणि विविध सवलती लागू केल्या आहेत. तसेच आपद्ग्रस्त तालुक्यातील बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भातील #शासननिर्णय निर्गमित करण्यात आला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीन वाहून जाणे, घरांची पडझड, जनावरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या सर्व आपद्ग्रस्तांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने हे विशेष पॅकेज लागू केले आहे. या विशेष पॅकेजमुळे बाधित पिके, शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा दुरुस्तीस मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी व्यक्त केला आहे.
जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित २५१ पूर्णतः व ३१ अंशतः बाधित तालुक्यातील बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात आले. जून ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत २६.६९ लाख हेक्टर तर सप्टेंबर २०२५ मध्ये जवळ जवळ ३९ लाख हेक्टर अशा सुमारे ६५ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेत पिकांचे नुकसान झाले असल्याचेही मंत्री श्री.जाधव-पाटील यांनी सांगितले.