नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वातावरणीय बदलामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ स्थिती व अवकाळी पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे येणाऱ्या शेतीतील पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने शेतकऱ्यांनी गहू, कांदा,टोमॅटो, द्राक्ष, मिरची, डाळींब आदी पिकांवर येणाऱ्या संभाव्य रोगांवर वेळेत योग्य ती उपाययोजना करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी केले आहे.
गहू हे पिक काढणीस तयार झाले असून पावसाची उघडीप होताच पिक काढावे किंवा मळणी करावी. पिक काढणीस 15 ते 20 दिवस अवधी असल्यास अशा पिकात सद्याच्या वातावरणामुळे गव्हाच्या दाण्यावरील काळे टोक समस्या वाढू शकते. त्यासाठी डायथेन एम 45, 20 ग्रॅम + कॉपर ऑक्झिक्लोराईड 20 ग्रॅम प्रती 10 लीटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. तसेच कांदा या पिकात पाण्याचा निचरा न झाल्याने मर रोगाची लागण पिकाला होते. त्यामुळे पाण्याचा निचरा होईल अशा पध्दतीने चर काढावेत. कांदा पिकावर जांभळा करपा आणि फुलकीडीचे प्रमाण वाढल्यास टेब्युकोनॅझोल 25 टक्के, डब्ल्यु जी 10 मि.ली. किंवा ॲझोक्झिस्ट्रॉबीन 18.2 टक्के अधिक डायफेनोकोनॅझोल 18.3 टक्के, एस सी 10 मि.ली. यापैकी 1 बुरशीनाशक अधिक फिप्रोनील 15 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. त्याचप्रमाणे फुलकिडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 15 मिली किंवा प्रोपेनोफॉस 10 मिली किंवा कार्बोसल्फॉन 10 मिली अधिक स्टीकर 10 मिली प्रती 10 लिटर पाण्यात गरजेनुसार मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी दिली आहे.
टोमॅटो पिकावर करपा व विविध बुरशीच्या प्रादुर्भावामुळे ठिपक्या रोगाचे प्रमाण वाढते. अशा झाडांवरील रोगग्रस्त पाने गोळा करुन जाळून नष्ट करावीत. या रोगांच्या नियंत्रणाकरीता बुरशीनाशकांची प्रमाणात आलटून पालटून फवारणी करावी.
द्राक्ष हे अतिशय संवेदनशील फळपिक असून तापमानातील चढउताराचा अनिष्ट परिणाम होतो. यावर नियंत्रणासाठी सल्फर 80 WDG @2.0 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी किंवा ही फवारणी करतांना घडावर डाग येवू नये म्हणून चांगल्या दर्जाचे स्प्रेडर्स वापरावेत. किंवा बुरशी नाशकांची प्रमाणात फवारणी करून वेलीवरील चिरलेले व सडलेले मणी आधी काढून टाकावेत. त्यानंतर बागेमध्ये क्लोरीनडाय ऑक्साईड 50 पीपीएम या प्रमाणात फवारणी केल्याने रेसिड्युची समस्या निर्माण होत नाही. द्राक्ष बागेतील पाने व घडांमधील साचलेले पाणी काढण्यासाठी रिकामा ब्लोअर उलटसुलट बागेत फिरवल्यास बागेतील आर्द्रता कमी होण्यास मदत होते.
मिरची या रोग नियत्रंणासाठी डायफेनकानॅझोल 10 मिली किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी. डाळींब या पिकासाठी डायफेनकानॅझोल 25 टक्के ईसी. 10 मिली किंवा किटाझीन 48 टक्के 10 मिली. किंवा मॅटीरम 55 टक्के अधिक पायऱ्या क्लोस्ट्रोबीन 0.5 टक्के डब्ल्यु जी 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी. त्याचप्रमाणे शेतातील जमिनीवर झाडावर व बांधावरील सर्व रोगग्रस्त पाणी फळे फांद्या व रोगट अवशेष गोळा करून नष्ट करावेत तसेच चार टक्के कॉपर डस्ट बागेमध्ये धुरळावी. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने संपूर्ण झाडावर बोर्डो मिश्रण 1 टक्के फवारावे किंवा बॅक्टीनाशक 5 ग्रॅम + कॅप्टन (0.5 टक्के) 50 ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करण्यात यावी, अशी माहिती श्री सोनवणे यांनी दिली आहे.
अवकाळी पावसामुळे करावयाचे व्यवस्थापनबाबत प्रा. राजेंद्र बिराडे, प्रभारी अधिकारी, पिंपळगाव बसवंत कांदा द्राक्ष संशोधन केंद्राचे सहाय्यक प्राध्यापक (वनस्पती रोगशास्त्र) डॉ.राकेश सोनवणे, डॉ. गंगेश बडगुजर तसेच डॉ. बबनराव इन्डे यांनी वरीलप्रमाणे उपाययोजना सुचविलेल्या आहेत, असेही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी कळविले आहे.
Unseasonal Rainfall Crop Disease Solution Agri Officer