नंदुरबार – नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी आज मांजरे, ता. जि. नंदुरबार येथे भेट देवून मेंढपाळ बांधवांचे सांत्वन केले. त्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे मांजरे येथील मेंढपाळ बांधवांच्या मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर नंदुरबार जिल्ह्यात 276 मेंढ्यांसह काही जनावरांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड. पाडवी यांनी आज मांजरे येथे भेट दिली. नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, अशा सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष वकील पाटील , यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.