शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राहाता तालुक्यातील पिंपळस, दाहेगांव, कोराळे या गावांमध्ये बेमोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे बाधित झालेल्या पिकांची महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. शेतकऱ्यांना पीक विम्यातून अधिकची मदत मिळवून देण्यासाठी प्रभावी पीक विमा योजना आणण्यासाठी शासन पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल. अशी ग्वाही ही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.
राहाता तालुक्यातील अनेक गावांत ८ व ९ एप्रिल,२०२३ रोजी बेमोसमी पाऊस, वादळी वारा, विजांचा कडकडाट व गारपिटीने थैमान घातल्याने द्राक्षे, डाळिंब, उन्हाळी कांदा, मका, हरभरा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पिंपळस गावांतील सुभाष कुदळे यांची द्राक्ष बाग, किशोर निरगुडे व गणेश धाडीवाल यांच्या कांदा पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, मंडलाधिकारी मोहसिन शेख आदी अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री. विखे – पाटील सांगितले की, एक रूपयात पीक विमा हा शासनाचा सकारात्मक निर्णय आहे. तरीही पीक विमा योजनेत धोरणात्मक बदल करणे गरजेचे आहे. विम्याची नुकसान भरपाई संरक्षित रक्कम वाढविण्यात येवून शेतकऱ्यांना अधिकची मदत देण्याचा निर्णय शासनपातळीवर लवकर घेण्यात येईल.
पीक नुकसानग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिर्डी संस्थानच्या सभागृहात महसूल, कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांच्या सहाय्याने आपापल्या शेतशिवारातील नुकसानाचे शंभर टक्के पंचनामे तातडीने करून जबाबदारीने नोंद करून घ्यावी. अशा सूचना दिल्या. या बैठकीला संगमनेर, राहाता व कोपरगांव तालुक्यातील अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते .
Unseasonal Rain Hailstorm Ahmednagar District Crop Loss