विशेष प्रतिनिधी, पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पुणे विद्यापीठाकडून तयारी सुरू झाली आहे. कोरोनामुळे सध्या शैशक्षणिक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. सध्या विद्यापीठाची प्रथम सत्राची परीक्षा सुरू आहे. १५ मे रोजी प्रथम सत्राची परीक्षा संपणार आहे. दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी मेअखेर वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यातील विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षा ऑनलाइनच होणार असल्याचे विद्यापीठाकडून कळविण्यात आले आहे. कोरोनामुळे नवीन शैक्षणिक वर्ष उशीराने सुरू झाले. त्यात ऑफलाईन परीक्षा होणार की ऑनलाईन याचा गोंधळ सुरू होता. मात्र, राज्यात कडक लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे सर्व प्रकारच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता दुसऱ्या सत्राची परीक्षा जूनमध्ये घेण्यासाठी विद्यापीठाने सर्व तयारी सुरू केली आहे.