नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे ‘इक्षणा ट्रेझर हंट’ उपक्रमास नुकताच प्रारंभ करण्यात आला आहे. विद्यापीठातील वस्तुसंग्रहालयाचे नुतनीकरण करण्यात येत असून यासाठी आपल्या संग्रहातील आरोग्यशास्त्राशी संबधीत महत्वपूर्ण वस्तू, कलाकृतींचे संकलन ‘इक्षणा ट्रेझर हंट’ उपक्रमाव्दारा करण्यात येत आहे.
विद्यापीठाचे मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी सांगितले की, विद्यापीठाचा ‘इक्षणा ट्रेझर हंट’ हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. मा. कुलगुरु महोदया यांच्या संकल्पनेनुसार इक्षणा म्युझियम मध्ये सर्व आरोग्य विद्याशाखांच्या इतिहास आणि भविष्याचा वेध अश्या सर्वच बाबींचा अंतर्भाव असणार आहे. इक्षणा म्युझियममध्ये विद्याशाखांची माहिती, पत्रके, छायाचित्र, औषधे, विद्याशाखांचा इतिहास, संशोधन आणि विकासाचे दस्तऐवजीकरण प्रदर्शित करण्यात येणार आहे.
त्या पुढे म्हणाले की, या अनुषंगाने आपल्या संग्रहात महत्वपूर्ण वैद्यकीय वस्तू, अनेक पुस्तके, डायरी, जुनी उपकरणे आणि साधने, वैद्यकीय कलाकृती, सर्जिकल, नमुने आणि स्मृतीचिन्ह असल्यास त्या भेट स्वरुपात विद्यापीठाकडे देण्यात याव्यात जेणेकरुन ही मौल्यवान माहिती, वस्तू ‘इक्षणा’मध्ये प्रदर्शन स्वरुपात मांडता येईल असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचा ‘इक्षणा ट्रेझर हंट’ उपक्रम सर्वांसाठी खुला आहे. यासाठी जुने दस्ताऐवज व कलाकृती आणि जुनी जर्नल्स, पुस्तके ‘इक्षणा’ संग्रहालयसाठी महत्वपूर्ण आणि आवश्यक आहेत. शिक्षक, विद्यार्थी व अभ्यांगतांनी वैयक्तीक व महाविद्यालयात आपल्या विभागप्रमुखांच्या परवानगीने व मदतीने अनेक दशकांपासून अस्पर्शित, विशेषतः वेअरहाऊस, स्टोअररुम, कॉलेजच्या जुन्या इमारतींमधील मोकळया जागा इत्यादी ठिकाणी छाननी करुन वस्तूंचे दस्तऐवजीकरण करावे.
वापरात नसलेल्या जुन्या वस्तू, दस्ताऐवज, कलाकृतींचे छायाचित्र काढून शीर्षक व अनुक्रमांकसह विद्यापीठास muhsmuseum@muhs.ac.in ई-मेलव्दारा विद्यापीठाकडे २५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत पाठवाव्यात. ‘इक्षणा’ संग्रहालयाकरीता आपल्याकडील वस्तूंची निवड झाल्यास आपणांस विद्यापीठाकडून कळविण्यात येईल. ‘इक्षणा ट्रेझर हंट’ संबंधी विद्यापीठाचे ‘इक्षणा’ म्युझियमचे समन्वयक तथा जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांच्याशी दूरवध्वनी क्र. 0253 -2539176 क्रमांकावर संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता. तरी विद्यापीठाच्या ‘इक्षणा ट्रेझर हंट’ या अनोख्या उपक्रमात जास्तीत जास्त शिक्षक, विद्यार्थी व अभ्यांगतांनी सहभाग घ्यावा असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.