नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दीक्षान्त समारंभाचे स्वरुप इंग्रजांच्या काळापासून आजही तसेच कायम आहे. यापुढे दीक्षान्त समारंभाचे स्वरुप बदलवून ते मराठमोळ्या पद्धतीने आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिले.
राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शासकीय तंत्र निकेतन स्वायत्त संस्थेचा 24 वा पदविका प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य तथा नियामक मंडळाचे सदस्य सचिव डॉ. मनोज डायगव्हाणे, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजचे संचालक राजेश चौधरी, शासकीय तंत्र निकेतनचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, परीक्षा नियंत्रक डॉ. एस. बारस्कर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पदविका प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांसाठी असतो. त्यामुळे असा कार्यक्रम विद्यार्थी केंद्रितच असावा, असे सांगून श्री. सामंत पुढे म्हणाले की, पदविका प्रदान समारंभ हा विद्यार्थ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारा असावा. विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वाटचालीसाठी या सोहळ्यातच मार्गदर्शन मिळावे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असावा. बदलत्या काळानुसार, पुढील काळात दीक्षान्त समारंभाचे स्वरुप बदलविण्यात येईल. पदविका प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी उद्योग, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, नामांकित कंपन्यांचे व्यावसायिक यांना आमंत्रित करण्यात येईल. विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ होईल. यामुळे पदविका प्रदान समारंभात भविष्यात आपल्या आवडीच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली अनुभवाची शिदोरी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांनी अनेक अडचणींचा सामना करीत अभ्यास केला. त्या काळात ऑनलाईन परीक्षा ही गरज होती. परंतु आता ऑफलाईन परीक्षा पद्धती स्वीकार करणे गरजेचे आहे. यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता बदलवून त्यांचे समुपदेशन करण्यासाठी प्राचार्य व प्राध्यापकांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
प्राचार्य डॉ. मनोज डायगव्हाणे यांनी यावेळी संस्थेची माहिती दिली. शासकीय तंत्र निकेतन नागपूर ही शंभर वर्षांहून अधिक जुनी संस्था आहे. या संस्थेला उत्तम वारसा लाभला आहे. विद्यार्थ्यांनी या संस्थेचा केवळ नावलौकिकच टिकवून ठेवायचा नाही तर तो वाढवायचा आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार आता एकाच वेळी विविध विद्याशाखांचा अभ्यास करण्याचा पर्यायही उपलब्ध होणार आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी विचारपूर्व पुढील शिक्षणाचा पर्याय निवडून योग्य दिशेने वाटचाल करण्यासंबंधी डॉ. डायगव्हाणे यांनी मार्गदर्शन केले.
पदविका प्राप्त करणे हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा टप्पा आहे. या संस्थेच्या पदविका अभ्यासक्रमात विविध पर्याय उपलब्ध आहेत. या विद्याशाखेच्या तांत्रिक ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी सफल अभ्यास केला आहे. विद्यार्थ्यांनी या ज्ञानाचा उपयोग देशाच्या कल्याणासाठी करावा, असे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. तत्पूर्वी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या प्रांगणातील ‘ब्रेव्ह फायर फायटर’च्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.
पदविका प्रदान सोहळ्यापूर्वी डॉ. डायगव्हाणे यांनी शासकीय तंत्रनिकेतनच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूर शासकीय तंत्रनिकेतन व नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यानंतर पदविका प्रदान समारंभाची घोषणा डॉ. डी. व्ही. जाधव यांनी केली. विविध विद्याशाखेतील पदविकाधारकांना यावेळी पदविका प्रदान करण्यात आल्यात. सिव्हिल इंजिनियरिंग, मेकॅनिकल इंजिनियरिंग, इलेक्ट्रीकल इंजिनियरिंग, ट्रॅव्हर्ल्स अँड टुरिझम आदी विद्याशाखेत पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम आणि व्दितीय क्रमांक मिळविलेल्या पदविकाधारकांना पदक, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. यानंतर पदविका धारकांकडून प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अधिव्याख्याता मेघा मचाले तर आभार एम. व्ही. सरोदे यांनी मानले. पदविका प्रदान समारंभाच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या मान्यवरांनी दीक्षान्त समारंभाचे उत्तरीय परिधान केले होते. शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध विद्या शाखेचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.