विशेष प्रतिनिधी, नाशिक
वातावरण बदलाबाबत जागतिक पातळीवर काम सुरू असताना आता स्थानिक पातळीवर राज्याच्या पर्यावरण विभागानेही काम सुरू केले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ एप्रिलला जागतिक पृथ्वीदिनी शपथ घेतल्यानुसार, राज्यातील शहरांतील कार्बन उत्सर्जनाचे (Race to Zero pledge) प्रमाण शून्यापर्यंत आणण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवर सुरू झाले आहेत. या मोहिमेत नाशिकनेही सहभाग घेतला आहे. नाशिकमधील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण २०५० पर्यंत शून्यावर आणण्याच्या शपथ पत्रावर नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी स्वाक्षरी केली आहे.
रेस टू झिरो मोहीम काय आहे
संयुक्त राष्ट्र संघाच्या पॅरिस येथील परिषदेत जागतिक तापमानवाढीस कारणीभूत असलेल्या कार्बन उत्सजर्नाचे प्रमाण शून्यापर्यंत (Race to Zero) आणण्याबाबत एक ऐतिहासिक करार झाला. जगातील कंपन्या, शहरे, राज्ये, देश, गुंतवणूकदार, विद्यापीठे आणि सर्व कलावंत यांच्या सर्वात मोठ्या विश्वासार्ह गटाने कार्बन उत्सर्जन २०३० पर्यंत निम्मे कमी करण्याबाबत तसेच वैयक्तिक पातळीवर २०५० पर्यंत कमी करण्याबाबत एकमत झाले होते. पॅरिस करारानुसार या मोहिमेत सहभागी झालेल्या शहरांना कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत याचा अहवाल द्यावा लागणार आहे.
नाशिक महत्त्वाचे का
वातावरण बदलाबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाच्या योजना असलेल्या माझे वसुंधरा अभियान, स्वच्छ भारत अभियान, स्मार्ट सिटी मिशन आणि राष्ट्रीय हवा स्वच्छता अभियानात नाशिक अग्रस्थानी आहे. या सर्व अभियानात पुढाकार घेऊन नाशिकने अनुकरणीय काम केल्याने Race to Zero या अभियानाला चांगलाच पाठिंबा मिळणार आहे.
महापालिकेला २० कोटींचा निधी
हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी नाशिकला २०.५ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. या निधीचा वापर अंत्यसंस्काराठी विद्युतदाहिनी उभारणे, नाशिक महापालिकेच्या कचरा व्यवस्थापनासाठी करण्यात येणार आहे. याचा थेट परिणाम हरितगृहवायू उत्सर्जन आणि वातावरण बदालावर होणार आहे. शुद्ध हवा मिळाण्याच्या महत्त्वावर नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांनी भर दिला आहे.
इलेक्ट्रिक बससेवा
कार्बनमुक्त परिवहन व्यवस्थेवर नाशिक महापालिकेने भर दिला आहे. त्यासाठी स्मार्ट रोड विकसित करण्यासह सायकल ट्रॅकही विकसित करण्यात येत आहेत. हवेतील प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून इलेक्ट्रिक आणि सीएनजी शहर बससेवेला लवकरच प्रारंभ होत आहे. पर्यावरणाचे संवर्धनासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे आयुक्त जाधव यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या प्रयत्नांना बळ
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वातावरण बदलाबाबतच्या प्रयत्नांमध्ये नाशिक महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आहे. हरितगृहवायू उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नांची नाशिकची दखल घेण्यात येत आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या माझी वसुंधरा अभियानामुळे Race to Zero च्या प्रयत्नांनाही बळ मिळणार आहे. त्यामुळे येथील स्थानिक स्वराज्य संस्थांनासुद्धा हवा, पाणी, कचरा, ऊर्जा स्वच्छ करण्याच्या प्रयत्नांना बूस्ट मिळणार आहे.