मुंबई – माणूस असो वा घड्याळ बारा वाजणार नाही म्हणाल तर कुणालाही आश्चर्यच वाटणार आहे. आयुष्यात किमान एकदा तरी प्रत्येकाच्या आयुष्यात अशी घटना घडते ज्यामुळे माणसाच्या चेहऱ्यावर बारा वाजलेले दिसतात. पण घड्याळाचे तर बाराशी जन्मोजन्मीचे नाते आहे. ते कधीच तुटलेले नाही. तरीही असे एक घड्याळ आहे ज्यात कधीच बारा वाजत नाही.
बारा हा तसा अशुभ आकडा मानला जातो. पण या घड्याळात बारा का वाजत नाही, याचे कारण कळल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हे आगळेवेगळे स्वित्झर्लँडमधील सोलोथर्न शहरातील आहे. या शहरातील टाऊन स्क्वेयरवर एक घड्याळ लागले आहे. त्या घड्याळ्यात केवळ ११ पर्यंत तासांचे आकडे आहेत. १२ हा आकडा नाहीच. येथील सेंट उर्सूसच्या मुख्य चर्चमध्येही ११ क्रमांकाचे महत्त्व तुम्हाला स्पष्ट बघायला मिळेल. हे चर्च ११ वर्षात बनून तयार झाले होते. इथे ११ दरवाजे आणि ११ घंटा आहेत.
येथील लोकांना ११ आकड्याचे असे काही आकर्षण आहे की ते आपला ११वा वाढदिवस जल्लोषात साजरा करतात. या वाढदिवसाला दिले जाणारे गिफ्ट्स सुद्धा ११ क्रमांकाशी जुळलेले असतात. ११ क्रमांकाच्या आकर्षणाला इतिहास आहे. असे मानले जाते की, पुरातन काळात सोलोथर्नचे लोक खूप मेहनत करायचे, पण तरीही त्यांच्या आयुष्यात कधीच आनंद आला नाही. त्यानंतर काही काळाने येथे डोंगरावरून एल्फ यायला लागले आणि लोकांना दिलासा द्यायला लागले. त्यानंतर येथील लोकांचे जीवनमान सुधारले.