मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रातील मोदी सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांनी वाढविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. कांद्याच्या बाजारपेठेत यामुळे दर गडगडणार आहेत. विरोधकांनी याप्रश्नी सरकारला घेरले असताना शेतकऱ्यांकडूनही ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. असे असतानाच आता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या जपानच्या पाच दिवसीय दौऱ्यावर आहेत. कांद्याच्या प्रश्नावरुन राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच, आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता शेतकऱ्यांचा रोष अयोग्य आहे. ही बाब लक्षात घेऊन फडणवीस यांनी जपानमधूनच याप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी दूरध्वानीद्वारे संपर्क साधला आहे. त्यानंतर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबाबत फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह तसेच केंद्रीय मंत्री मा. पियुष गोयलजी यांच्याशी जपानमधून दूरध्वनीवर संपर्क केला. केंद्र सरकारने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येतील, अशी घोषणा त्यांनी केली आहे. ₹2410 प्रतिक्विंटल या दराने ही खरेदी करण्यात येईल. यातून मोठा दिलासा आपल्या राज्यातील कांदा उत्पादकांना मिळेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.