इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे फारसे वादात सापडत नाहीत. मात्र, त्यांचे एक वक्तव्य सध्या देशभर चर्चिले जात आहे. आम्ही मंत्री असल्याने आम्हाला कायदा तोडण्याचा अधिकार आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मात्र, त्यांनी हे वक्तव्य का केले, कशासंदर्भात ते होते, हे जाणून घेणे आवश्यक आहे. गरिबांच्या, लोकांच्या कल्याणात आडवा येणारा कायदा तोडण्याचा अधिकार आम्ही मंत्री असल्याने आम्हाला आहे, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.
‘महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स’च्या नागपूर शाखेने आदिवासींच्या आरोग्यासाठी ‘ब्लॉसम’ नावाचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन करताना गडकरी बोलत होते. गडचिरोली आणि मेळघाटमधील रस्ते निर्माण करताना वनविभागाने त्रास दिल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. तसेच तेव्हा मी माझ्या मार्गाने प्रश्न सोडवल्याचाही उल्लेख केला.
पुढे ते म्हणाले, “मी महाराष्ट्रात १९९५ मध्ये मंत्री होतो. त्यावेळी मी मुंबईत अनेक रस्ते, पूल बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसं करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या भागात कुपोषणामुळे २,००० मुलांचा मृत्यू झाला. तेथील ४५० गावांना रस्ते नव्हते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते. खूप प्रयत्न केले तरीदेखील वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला. या भागात अनेक लोक मागासलेली होती. त्यामुळे वनविभागाने त्रास देऊनही मी माझ्या मार्गाने नंतर प्रश्न सोडवला. गरीबाचं कल्याण करण्यासाठी कोणताही कायदा आडवा येत नाही. गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत,” असं पुढे ते म्हणाले.
गडकरी म्हणाले की, “तुम्ही (अधिकारी) म्हणाल तसं सरकार चालणार नाही. तुम्ही फक्त ‘येस सर’ म्हणायचं आणि आम्ही म्हणतो त्याची अंमलबजावणी करायची”, हे मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगतो. आम्ही म्हणू तसं सरकार चालेल. त्यामुळे मी सर्व कायदे तोडून ४५० गावं जोडली. कधी मेळघाटला गेलं तर ते दिसेल. स्वातंत्र्यानंतर खऱ्या अर्थाने तेथील लोकांना स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांचा सामाजिक आर्थिक विकास झाला,” असंही गडकरींनी यावेळी नमूद केलं.
बघा नितीन गडकरी यांच्या संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ…
https://twitter.com/nitin_gadkari/status/1556915899747401728?s=20&t=RXL8nFGHQtrEBQ_uGVB-og
Union Minister Nitin Gadkari Statement on Act