अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्वीच्या काळात मुले होण्यासाठी नवस सायस करण्यात येत असत. त्यामुळे भगत, बुवाबाजी यांचेही मोठी चलती असे, परंतु कालांतराने वैज्ञानिक जनजागृती झाल्याने या अंधश्रद्धा काहीशा कमी झाले आहेत. परंतु अद्यापही काही ठिकाणी असे प्रकार घडतातच. मात्र आता बहुतांश नागरिकांना याबद्दल माहिती झाली आहे की, केवळ नवस करून किंवा देव देव करून मुले होत नाहीत, हेच उदाहरण मंत्री नितीन गडकरी यांनी वापरले आणि चांगलाच हशा पिकला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आपल्या भाषणात वेगवेगळी उदाहरणे देत असतात, ही उदाहरणे देताना ते वातावरण हलके फुलके करण्याचाही प्रयत्न करतात. एका कार्यक्रमातील देखील त्यांनी असाच किस्सा सांगितला आणि चांगलाच हशां पिकला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आधुनिक शेतीवर बोलताना शेतकऱ्यांना वैज्ञानिक व तांत्रिक प्रयोगांची मदत घेण्याचे आवाहन केले. तसेच चांगले उत्पादन काढले, चांगले पॅकिंग केले, तर उत्पन्न वाढेल, असे मत व्यक्त केलं. यावेळी त्यांनी “देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केले नाही, तर पोरं कशी होणार?” असा सवालही केला. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
अमरावती येथे एका कृषी मेळाव्यात गडकरी बोलत होते. नितीन गडकरी पुढे म्हणाले की, आता आपल्याला शेती अशी करायची आहे की प्रथम क्रमांकावर शेती राहिली पाहिजे, द्वितीय क्रमांकावर व्यवसाय आणि तिसऱ्या क्रमांकावर नोकरी आली पाहिजे. तुम्ही मनात आणलं तर वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रयोगाच्या आधारे उत्पादन वाढवून आणि खर्च कमी करून जागतिक बाजारपेठेत जाऊन उत्पन्न वाढवता येते, असेही त्यांनी अनेक उदाहरणे देत स्पष्ट केले.
https://twitter.com/nitin_gadkari/status/1548635022533750784?s=20&t=HGxsfIRIyKIl_DctEeeNDw
गडकरी आणखी पुढे म्हणाले की, उत्तम शेतीसाठी तुम्हालाच हे करायचं आहे. एकतर परमेश्वर किंवा सरकार असे व्हायला नको. देवाने दिले, देवाने नेले असे जमत नाही. देवाचा आशीर्वाद जरूर पाहिजे, पण देवाचा आशीर्वाद असून भागत नाही. देवाचा आशीर्वाद आहे आणि लग्न झाल्यावर तुम्ही काहीच केलं नाही, तर पोरं कशी होणार?” “तुम्हाला देखील काही पुढाकार घ्यावा लागतो. हे उदाहरण लोकांना जास्त चांगलं समजतं. त्यामुळे तुम्हीच तुमच्या या प्रयत्नातून हे प्रयोग यशस्वी करा. माझ्या वक्तव्यातून चुकीचा अर्थ काढू नका. तुम्ही प्रयत्न केला, तर यात तुम्हाला नक्की यश मिळेल,” असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं. नाशिकमधील आधुनिक शेतकरी व उद्योजक विलास शिंदे लंडनच्या बाजारात द्राक्षे पाठवत आहेत, तर आपली संत्री का जात नाही? आपण कशामुळे मागे का आहोत? याला पश्चिम महाराष्ट्र जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहात,” असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
Union Minister Nitin Gadkari Marriage Baby Farming Video