मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यावर अखेर हातोडा पडला आहे. राणेंच्या बंगल्यातील बांधकाम अनधिकृत असल्याने हा भाग पाडण्याचे काम सुरू झालं आहे. स्वत: नारायण राणे यांनीच हे बांधकाम तोडण्यास सुरुवात केली असल्याचे समोर येत आहे.
जुहू येथे नारायण राणे यांचा अधिश बंगला आहे. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार झाली होती. त्यानंतर मुंबई महापालिकेने राणे यांना या बांधकामाबद्दल नोटीस बजावली होती. तसेच राणे यांच्या बंगल्याची पाहणीही केली होती. यानंतर महापालिकेने अहवाल तयार केला होता. या प्रकरणात राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. कोर्टानेही पालिकेचा रिपोर्ट ग्राह्य धरून राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर कोर्टाने येत्या दोन आठवड्यात बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. राणे यांनी स्वत: हे बांधकाम पाडून घ्यावं किंवा महापालिका तोडक कारवाई करेल, असं कोर्टाने म्हटलं होतं. कोर्टाने राणेंना दहा लाखाचा दंडही ठोठावला होता.
कोर्टाच्या या आदेशानंतर राणे यांनी त्यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम आजपासून तोडण्यास सुरुवात केली आहे. हे बांधकाम पाडल्यानंतर महापालिका पुन्हा पाहणी करेल. तसेच तोडक कारवाईचा अहवाल करून हा अहवाल कोर्टात सादर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, बंगल्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई करावी लागल्याने राणेंसाठी हा मोठा झटका असल्याचे सांगितले जात आहे.
Union Minister Narayan Rane Bunglow Demolition Work
Mumbai MBC Adhish