नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्या घरी लग्न सोहळा असतो तेव्हा हा लग्न सोहळा अपूर्व उत्साहात साजरा होत असतो. लग्नाची घाई गडबड, घरात आप्त साकीयांचा वावर.. लग्नाच्या विविध प्रथेप्रमाणे सर्व गोष्टींची तयारी होत असते. आणि त्याचाच भाग म्हणून पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम असतो. आणि याच कार्यक्रमात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार सहभागी झाल्या. मंत्र्यांनीच चक्क पुऱ्या लाटल्याने ही बाब सर्व पंचक्रोशीत चर्चेची बाब ठरली.
चांदवड तालुक्यातील देनेवाडी गावचे प्रगतीशील शेतकरी शिवाजी मोरे यांच्या मुलीचे लग्न आहे. या लग्नाला हजेरी लावता येणार नव्हती म्हणून मंत्री डॉ. भारती पवार या लग्न घरी शुभेच्छा देण्यासाठी आल्या. प्रसंगी योगायोगाने पुऱ्या लाटण्याचा कार्यक्रम सुरू होता. याची दखल घेत डॉ. पवार यांनी कुठलाही बडेजाव न दाखवता चक्क पुऱ्या लाटण्यासाठी बसल्या. ही बाब पाहून उपस्थितांच्या उत्साहाला उधाण आले.
याचवेळी पुऱ्या लाटता लाटता लग्नाची गाणी सुरू झाली. नवरी येऊन बसली. सर्वच महिला पुऱ्या लाटण्यात मग्न झाल्या. आपल्या मुलीच्या लग्नात स्वतः मंत्री पुऱ्या लाटत असल्याने लग्नघरच्या कुटुंबाचा ऊर आनंदाने भरून आला. डॉ. पवार या केंद्रीय मंत्री असूनही त्यांनी कुठलाही गर्व किंवा बडेजाव मिरवला नाही. आपले पाय जमिनीवरच असल्याचे या प्रसंगातून डॉ. पवार यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळेच मंत्र्यांच्या या पुऱ्या लाटण्याची चर्चा तालुक्यातच नव्हे तर सर्वदूर पसरली आहे. परिणामी, डॉ. पवार यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Union State Health Minister Dr. Bharti Pawar Making Puri at Wedding home Video