नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ओमान मधील मस्कत येथे होत असलेल्या तिसऱ्या जागतिक उच्च-स्तरीय एएमआर परिषदेत सहभागी झाल्या आहेत. ओमान मधील मस्कत येथे सूक्ष्मजीवप्रतिबंधकांना प्रतिरोध करण्याची क्षमता (एएमआर) यावरील तिसरी जागतिक उच्च-स्तरीय परिषद झाली. 15 हून अधिक देशांतील 22 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.
मंत्रिस्तरीय पूर्ण सत्रात डॉ. पवार यांनी सहभाग घेतला. त्या म्हणाल्या की, एएमआर ही एक मूक आणि अदृश्य महामारी आहे ज्याकडे इतर सार्वजनिक आरोग्य प्राधान्यक्रमांद्वारे दुर्लक्ष होऊ शकत नाही , असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात चार संस्थांद्वारे एएमआर वर बहु -भागधारक भागीदारी मंचाची सुरुवात करण्यात आली. एएमआर चा प्रसार आणि त्यानंतरच्या जीवघेण्या परिणामांवर भर देत डॉ. पवार यांनी अधोरेखित केले की एएमआर हा जागतिक आरोग्याला धोका असून त्याचे आरोग्य, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या गंभीर परिणाम होऊ शकतात.
एएमआरचा सामना करण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करत आरोग्य राज्यमंत्री म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, एएमआर विरोधात लढण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. भारताने 2016 मध्ये नवी दिल्ली येथे एएमआर परिषद आयोजित केली होती. एएमआरचा प्रतिकार करणे याचा राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमात ठळक उल्लेख आहे आणि जागरूकता आणि क्षमता निर्माण, प्रयोगशाळेचे बळकटीकरण, देखरेख, संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण, सूक्ष्मजीवप्रतिबंधकांवर लक्ष आणि नवीन औषधांवरील संशोधन, निदान आणि नव संशोधनाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आल्यामुळे सर्वोच्च पातळीवर राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली आहे.
Union Minister Bharti Pawar Oman Tour Conference