नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गुन्हेगारीने जणू कळस गाठला असल्याने नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच आता आणकी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशकात सर्वसामान्यच काय पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे कुटुंबियही सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. डॉ. पवार यांच्या मातोश्रींचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले आहे. यानिमित्ताने शहर पोलिसांच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
शहर परिसरात चोरी, दरोडा, घरफोडी, हाणामारी, हत्या या सारखे गुन्हे सर्रास घडत आहेत. दोन दिवसापूर्वी तर २४ तासात हत्येच्या दोन घटना घडल्या. नाशिक पोलिस गुन्हेगारी कमी करण्यात कमी पडत असल्याची सर्वसामान्यांची भावना आहे. त्यातच आता तर केंद्रीय मंत्र्यांचे कुटुंबियही चोरट्यांनी लक्ष्य केल्याने ही बाब केवळ शहरातच नाही तर राज्यातच चर्चेला आली आहे.
नेमकं काय घडलं
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल या म्हसरुळ परिसरात राहतात. त्या आरटीओ परिसरातील भाजी बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेल्या होत्या. बागुल यांनी भाजी खरेदी केली आणि त्या घराकडे जात होत्या. त्याचवेळी त्यांच्याजवळ दुचाकीस्वार आले. त्या दुचाकीवर दोन जण बसलेले होते. बागुल यांना वाटले की ते काही पत्ता किंवा माहिती विचारत आहेत. मात्र, क्षणाचाही विलंब न करता या चोरट्यांनी बागुल यांच्या गळ्याला हात घातला आणि थेट मंगळसूत्र ओरबाडले आणि चोरटे क्षणार्धात पसार झाले. आसपास कुणी नसल्याने बागुल यांना काहीच करता आले नाही. अडीच ते तीन तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले आहे. या सर्व प्रकारानंतर बागुल यांनी म्हसरुळ पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुप्रिया सुळेंची जोरदार टीका
नाशिकच्या या घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गॄहखाते निष्क्रिय असल्याने हि स्थिती उद्भवली असून गुन्हेगार निर्ढावले आहेत. केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या आईंच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी भररस्त्यात हिसकावून नेल्याची घटना घडली. यामध्ये सुदैवाने त्यांना काही इजा झाली नाही. देव त्यांना निरोगी, दिर्घायुष्य देवो. परंतु या घटनेमुळे जर मंत्र्यांचे नातेवाईक देखील सुरक्षित नाहीत हे उघड झाले आहे. त्यांची हि स्थिती तर सर्वसामान्य जनतेचे काय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की कृपया आपण कायदा सुव्यवस्था राखण्याबाबत गांभिर्याने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Union Minister Dr Bharti Pawar Mother Chain Snatching Nashik Crime
City Police Health State Supriya Sule