इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठवाड्यातील भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या तत्पर सेवेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. व्यवसायाने सर्जन असलेल्या डॉ. कराड यांनी एकदा विमानात प्रवाशाचे प्राण वाचविले होते. त्यानंतर आता बेशुद्ध पडलेल्या एका फोटोग्राफरला नवसंजीवनी दिली आहे. त्यामुळे डॉ. कराड यांचे विशेष कौतुक होत आहे.
कार्यक्रमादरम्यान एक फोटोग्राफर बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी डॉ. कराड यांनी तातडीने या व्यक्तीला आरोग्यविषयक सहकार्य केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. कराड हे दिल्लीतील ताज मानसिंग येथे मुलाखत देत होते. ही चर्चा कव्हर करण्यासाठी आलेला एक फोटोग्राफर बेशुद्ध पडला आणि त्याच्या नाडीचे ठोके लक्षणीयरीत्या खालावले. हे पाहून डॉक्टर कराड तातडीने मदत सुरू केली आणि नाडी तपासली. यानंतर त्यांनी पल्स रेट वाढवण्यासाठी फोटोग्राफरचे पंजे दाबण्यास सुरुवात केली.
सुमारे ५-७ मिनिटांनी फोटोग्राफरची प्रकृती सुधारू लागली. यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी मिठाई खाऊ घातली. हे प्रकरण समोर आल्यानंतर डॉ. कराड यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. योगगुरू स्वामी रामदेव यांनीही डॉ. कराड यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिल्ली ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या डॉ. कराड यांनी विमानातील एका प्रवाशाला अशीच मदत केली होती. त्यांनी विमानाच्या आपत्कालीन किटमध्ये उपस्थित प्रवाशाला इंजेक्शन दिले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे कौतुक केले होते. ते महाराष्ट्रातील राज्यसभेचे खासदार आहेत आणि जुलै 2021 मध्ये मोदी मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळाली आहे.
https://twitter.com/DrBhagwatKarad/status/1537669089941782528?s=20&t=AxNGX5be3m5qOJZAsirMPA