नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रध्दा वालकर हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ माजली आहे. याचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात येत आहे. यावर पहिल्यादांच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. श्रद्धा वालकरच्या आरोपीला कठोर शिक्षा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, आरोपी आफताब हा ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.
संपूर्ण देशात खळबळ माजवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी दररोज एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. श्रद्धाची हत्या करणारा आफताब पूनावालाचे क्रौर्य पाहून संपूर्ण देश हादरला आहे. यावरून आता राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या हत्याकांडावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा गुन्हा आपल्याकडून त्यावेळी अतीव संतापाच्या भरात झाला. आपण पोलिसांना तपासात सर्वतोपरी सहकार्य करत आहोत, असे आफताबने न्यायालयासमोर सांगितले होते. यानंतर आता आफताबच्या कोठडीत चार दिवसांनी वाढ करण्यात आली. तसेच आफताबच्या लाय डिटेक्टर-पॉलीग्राफ टेस्ट परवानगी देण्यात आली आहे.
सध्या या प्रकरणावर राज्यासह देशभरातील अनेक नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्याच वेळी दिल्लीमधील कार्यक्रमामध्ये गृहमंत्री शाह यांनी सांगितले की, ज्याने कोणी श्रद्धा वालकरची हत्या केली असेल त्याला सध्याच्या स्थितीत म्हणजे कायद्यानुसार कठोर शिक्षा होईल याची काळजी दिल्ली पोलीस आणि फिर्यादी पक्ष नक्की घेईल, असाही शाह यांनी विश्वास व्यक्त केला.
आफताब पुनावालाने त्याची लिव्ह-इन पार्टनर असलेल्या श्रद्धाचा १८ मे रोजी दिल्लीतील राहत्या घरी गळा आवळून जीव घेतला. त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करुन ते घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तीन आठवडे तो या तुकड्यांची विल्हेवाट लावत होता. आता आफताबला अवयवांचे अवशेष शोधण्यासाठी मेहरौली येथील जंगलातील एका तलावासह मैदानगढीत तलावापाशी नेण्यात येणार आहे. या घटनेमुळे देशभरात तीव्र पडसाद उमटले असून त्याला धार्मिक रंग देखील देण्यात येत आहे तसेच याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
Union Home minister Amit Shah on Shraddha Murder Case