नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहाच्या संबंधात स्टॉक रिगिंग आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. मोदी सरकार अदानी समूहाला मदत करत असल्याचा आरोप काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केला आहे. राहुल गांधींनी संसदेत मोदी आणि अदानी यांचा नेमका काय संबंध आहे, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. त्यावर मोदींनी कुठलेही उत्तर दिलेले नाही. तसेच हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयातही गेले आहे. आता या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रथमच प्रतिक्रीया दिली आहे.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, तुम्ही सत्यावर हजार कारस्थान केले तरी काहीही होत नाही. तो लाखो सूर्यासारखा तेजस्वी बाहेर येतो. २००२ पासून मोदीजींच्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे, परंतु प्रत्येक वेळी ते अधिक मजबूत, सत्यवादी आणि जनतेची लोकप्रियता मिळवत आहेत, असे शहा यांनी स्पष्ट केले.
हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालात अदानी समूहाच्या संबंधात स्टॉक मॅनिपुलेशन आणि आर्थिक फसवणुकीचे दावे करण्यात आले होते. या अहवालानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. अहवालानंतर, अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी, जे गेल्या महिन्यात २४ जानेवारीपर्यंत जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते, त्यांच्या संपत्तीतही मोठी घट झाली, ते जगातील श्रीमंतांच्या पहिल्या १० यादीतून बाहेर पडले.
अदानी हिंडेनबर्ग प्रकरणानंतर विरोधकांच्या आरोपांवर गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, लपवण्यासारखे किंवा घाबरण्यासारखे काही नाही. सरकार अदानी समूहाची बाजू घेत असल्याचा आरोप काँग्रेसने केल्यानंतर गृहमंत्र्यांनी ही ‘प्रतिक्रिया’ दिली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना ते म्हणाले की, सरकार किंवा भाजप यांच्याकडे लपवण्यासारखे काही नाही आणि घाबरण्याची गरज नाही. अदानी मुद्द्यावरून काँग्रेसवर हल्लाबोल करताना केंद्रीय मंत्री म्हणाले की, विरोधकांना फक्त आवाज कसा काढायचा हे माहित आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात जावे, असे आव्हान त्यांनी दिले.
तुमचा पक्ष भाजप अदानीशी मैत्री करत आहे. अदानी सर्व कंत्राटे मिळवत असल्याचाही काँग्रेसचा आरोप आहे. तर भाजपचा बचाव कमकुवत आहे, असे विचारले असता शहा म्हणाले की, याप्रकरणी भाजपकडे लपवण्यासारखे आणि घाबरण्याचे काहीही नाही. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका प्रकरणाची दखल घेतली आहे. अशा स्थितीत देशाच्या मंत्रिमंडळाचा सदस्य असल्याने मी सध्या काही बोलणे योग्य ठरणार नाही.
Union Home Minister Amit Shah on Hindenburg Adani Row