इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आणि भाजपदरम्यान सुरू असलेला वाद वाढतच चाललेला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान ममता बॅनर्जी आणि केंद्र सरकार दरम्यान सुरू झालेला संघर्ष आता नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना सक्तवसुली संचालनालयाने कोळसा घोटाळा प्रकरणी दिल्लीतील कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. याची प्रतिक्रिया त्वरित पाहायला मिळाली. बंगाल सरकारने बाह्या सरसावल्या असून, या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांना कोलकाता पोलिसांनी बोलावले आहे.
ईडीने तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अभिषेक बॅनर्जी आणि त्यांची पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना २१ आणि २२ मार्चला कथित कोळसा घोटाळा प्रकरणात पश्चिम बंगालचे मंत्री मोलॉय घटक यांना बोलावले आहे. त्याशिवाय सीबीआयने टीएमसीचे बिरभूम जिल्ह्याचे प्रमुख अनुब्रत मंडल यांना बोलावले आहे.
अभिषेक बॅनर्जी यांना दिल्लीला बोलावण्यावरून टीएमसीने केंद्रावर हल्लाबोल केला आहे. विधानसभा निवडणुकीत टीएमसीकडून पराभूत झाल्यामुळे केंद्रातील भाजप सरकार बदला घेत आहे, असा आरोप टीएमसीने केला आहे. मोदी सरकार केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग करत आहे. अभिषेक बॅनर्जी यांना दिल्लीला बोलावून घेतल्याने आता ममता बॅनर्जी सरकार आक्रमक झाले आहे.
कालिघाट पोलिसांनी ईडीच्या तीन अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आहे. कोळसा घोटाळा आणि पशुतस्करी प्रकरणाचा हे अधिकारी तपास करत आहे. त्यांना सोमवारी बोलावण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध कलम १६० अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांना बोलावून ममता बॅनर्जी सरकारने पलटवार केल्याचे बोलले जात आहे.
अभिषेक बॅनर्जी यांना ईडीकडून दिल्लीला बोलावल्यामुळे नाराज ममता बॅनर्जी यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फास आवळला आहे, असे मानले जात आहे. तथापि, या प्रकरणी भाजपकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.