नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, नागरी सेवा परीक्षा देण्यासाठीची वयोमर्यादा शिथिल करावी तसेच, परीक्षा देण्याची आणखी एक संधी दिली जावी, अशी विनंती करणारी अनेक आवेदने नागरी सेवा परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी सरकारला पाठवली होती, अशी माहिती केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देतांना दिली.
नागरी सेवा परीक्षा देण्यास इच्छुक उमेदवारांनी या संदर्भात, रिट याचिका दाखल करत, सर्वोच्च न्यायालयासमोरही आपले म्हणणे मांडले आहे. आणि यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, या विनंतीवर सरकारने विचारही केला आहे. त्यानुसार, सर्व परिस्थितीचा विचार करता, असे लक्षात आले की परीक्षा देण्यासाठी दिल्या जाणाऱ्या संधी वाढवणे किंवा वयोमर्यादा शिथिल करणे शक्य दिसत नाही.
आणखी एका संबंधित प्रकरणात, केंद्रीय लोकसेवा आयोगाने माहिती दिली आहे की, वस्तुनिष्ठ प्रकारच्या परीक्षेत (उदाहरणार्थ लोक सेवा पूर्व परीक्षा), त्या वर्षासाठी असलेल्या परीक्षांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच उत्तरे जाहीर केली जातात, म्हणजे परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यावर आणि ती आयोगाच्या संकेतस्थळावर एक महिना उपलब्ध असतात आणि त्यानंतर एक महिना संग्रहित विभगात उपलब्ध असतात, अशी माहिती डॉ जितेंद्र सिंग यांनी दिली.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने अशीही माहिती दिली आहे की निकाल पुरेशा वेळात प्रकाशित केले जातात, जे परीक्षेच्या वार्षिक वेळापत्रकाशी सुसंगत असते, ज्याची पुरेशा वेळेत आगाऊ सूचना दिली जाते. सर्वोच्च न्यायालयाने 20.02.2018 रोजी दिलेल्या निकालानुसार उत्तर पत्रिका उघड करण्यापासून सूट दिलेली आहे.