नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ग्राहक व्यवहार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत तूर आणि उडीद डाळीच्या साठ्यासंदर्भात वास्तव स्थितीचे निरीक्षण आणि या संदर्भात संवाद साधण्यासाठी चार राज्यांमधील 10 विविध ठिकाणांना भेट दिली.
ज्या अधिकाऱ्यांनी प्रमुख कडधान्य बाजारांना भेट दिली त्या अधिका-यांची या संदर्भात ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव, रोहित कुमार सिंह यांनी एक बैठक घेतली आणि प्रमुख डाळ बाजारपेठाना भेट देऊन बाजारातील प्रमुख व्यापाऱ्यांबरोबर संवादही साधला. गेल्या आठवड्यात, 15 एप्रिल, 2023 रोजी केंद्र सरकारच्या सचिवांनी इंदूर येथे अखिल भारतीय डाळमिल संघटनेसोबत बैठक आयोजित केली होती.या व्यतिरिक्त, विभागाने 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्नाटक, मध्य प्रदेश,महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये वास्तवाचा आढावा घेण्यासाठी विविध ठिकाणी भेटी देण्यासाठी नियुक्त केले.
बाजारातील प्रमुख व्यापारी आणि राज्यस्तरीय अधिकार्यांशी झालेल्या संवादातून असे दिसून आले की ई-पोर्टलवर नोंदणी आणि साठा यासंदर्भातली माहिती देणाऱ्यांची संख्या वाढत असताना, मोठ्या संख्येने बाजारातील व्यापाऱ्यांनी एकतर नोंदणी केलेली नाही किंवा नियमितपणे त्यांच्या मालाच्या साठ्याची स्थिती दर्शविण्यात ते अयशस्वी झाले. असे निदर्शनास आले आहे की व्यवहाराधीन साठा, जसे की, लिलावासाठी मंडईत पडलेला शेतकऱ्यांचा साठा, बंदरांवर सीमाशुल्क मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेला साठा असे साठे सध्याच्या देखरेख यंत्रणेतून सुटले आहेत. शिवाय, हे देखील निदर्शनास आले आहे की गिरणीवाले आणि व्यापारी/व्यावसायिक यांनी साठा जाहीर करण्यापासून वाचण्यासाठी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांच्या नावाने त्यांचा साठा गोदामांमध्ये ठेवला आहे.
विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंदूर, चेन्नई, सालेम , मुंबई, अकोला, लातूर, सोलापूर, कलबुर्गी, जबलपूर आणि कटनी अशा विविध ठिकाणी भेटी दिल्या आणि राज्य सरकारे, मिल मालक , व्यापारी, आयातदार आणि बंदर प्राधिकरणांचे अधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि मिल मालक, आयातदार आणि व्यापारी यांच्या संघटनांसह सर्वांची एकत्रित बैठक घेतली. बाजारातील व्यापाऱ्यांना साठा जाहीर करण्याच्या महत्त्वाबाबत जागरूक करण्यात आले आणि त्यांनी वास्तव साठे नियमितपणे घोषित करण्यास सांगितले गेले अन्यथा राज्य सरकारकडून अघोषित साठ्याचे अभिग्रहण करणे आणि साठा जप्त करणे यासारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते, याबाबतच्या सूचना दिल्या गेल्या.
साठा प्रकटीकरण डेटा सुधारण्यासाठी, विभागाने https://fcainfoweb.nic.in/psp/ या ई-पोर्टलमध्ये काही बदल केले आहेत. ज्या आयातदारांनी त्यांच्या मालाच्या क्लिअरन्स् साठी जाणूनबुजून विलंब केला आहे त्यांच्यावर आवश्यक कारवाई करण्यासाठी ग्राहक व्यवहार विभाग सीमाशुल्क विभागाच्या संपर्कात आहे. तूर आणि उडीद डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्याचे प्रयत्न जारी ठेवण्याचा ग्राहक व्यवहार विभागाचा मानस आहे.
Union Government Pulses Tur Urad Dal Storage