पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन सहकार धोरण तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुरेश प्रभू समितीचा अहवाल लवकरच सादर होणार असून त्यानंतर लगेचच नवीन धोरण जाहीर केले जाईल अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी आज पुण्यात दिली.
पुण्यातील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकार.व्यवस्थापन संस्था अर्थात व्हेमनिकोन च्या ५५ आणि. ५६ व्या तुकडीच्या पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. एकूण ११८ जणांना यावेळी वर्मा यांच्या हस्ते पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात आले. सहकार मंत्रालयाचे संयुक्त सचिव आलोक अग्रवाल, संस्थेच्या संचालक हेमा यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वर्मा पुढे म्हणाले की, या संस्थेतून पदवी. अथवा पदविका घेऊन बाहेर पडणाऱ्या १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळत आहे ही अभिमानाची गोष्ट असली तरी ग्रामीण भागाचा विकास करणारे उद्योजक या संस्थेतून निर्माण होण्याची खरी गरज आहे. सहकारातून समृध्दी हा मंत्र खऱ्या अर्थाने त्याच वेळी प्रत्यक्षात येणार आहे .
भारताची अर्थव्यवस्था लवकरच ५ ट्रिलियन डॉलर पर्यंत झेप घेणार असून त्यात सहकार क्षेत्राचे योगदान सर्वाधिक राहील असा विश्वास वर्मा यांनी यावेळी व्यक्त केला. नव्या सहकार धोरणाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेत वैकुंठ मेहता सारख्या संस्था मोलाची भूमिका बजावत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले .
सहकार क्षेत्रासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून ग्रामीण भागाचा कायापालट करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना वर्मा यांनी सहकार क्षेत्राच्या वृद्धीसाठी केंद्राने घेतलेल्या अनेकविध निर्णयांची यावेळी माहिती दिली. ग्रामीण भारतातील विविध कार्यकारी सोसायट्या ना पेट्रोल पंप आणि गॅस अजन्सी देण्यास प्राधान्य दिले जाणार असून प्रत्येक गावात धान्य साठवणुकसाठी गोदामे उभारली जाणार असल्याची माहिती वर्मा यांनी दिली.
देशातील सहकार क्षेत्र अधिक बळकट करण्यासाठी सहकार मंत्रालयाने अनेक निर्णय घेतल्याचे संयुक्त सचिव आलोक अगरवाल यांनी यावेळी सांगितले . संस्थेच्या संचालक हेमा यादव यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले तर रजिस्ट्रार व्हीं. सुधीर यांनी आभार प्रदर्शन केले.
Union Government New Cooperative Policy Soon