मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सरकारी कर्मचारी म्हटल्यावर सुट्या, वेतनवाढ, महागाई भत्ता यासारख्या अनेक सुविधांचा उल्लेख होतो. पण एक योजना अशी आहे जी फक्त केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांसाठीच आहे. आता मात्र ही योजना पुरुष कर्मचाऱ्यांसाठीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पुरुषांसाठी ही गुड न्यूज ठरली आहे.
केंद्र सरकारची आरोग्य योजना सीजीएचएस ही आतापर्यंत फक्त महिलांसाठीच होती. मात्र आता पुरुष कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर पुरुषांसोबत त्यांचे कुटुंब, आई-वडील, सासू-सासरे यांनाही त्यात समाविष्ट करून घेण्यात आले आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांना ओपीडीमधील उपचार आणि औषधांचा खर्च, शासकीय रुग्णालयातील उपचार सुविधा, कृत्रिम अवयवांसाठीचा खर्च, खासगी आणि मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत खर्च होणारा पैसा, इत्यादींचा लाभ मिळतो.
खरे तर केंद्र सरकारचा कर्मचारी म्हटल्यावर तो खासगी रुग्णालयातच उपचार घेणार असा समज आहे. मात्र बहुतांश कर्मचारी हे आजही सरकारी रुग्णालयातच कुटुंबाला उपचारासाठी घेऊन जातात. त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी असणार आहे. आयुष्मान भारत प्रमाणे सीजीएचएस ही देखील भारत सरकारची एक महत्त्वाची आरोग्य योजना आहे. याअंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना स्वस्त दरात रुग्णालयात उपचारांचा लाभ मिळतो. विशेष उपचार, औषधे आणि मोफत आरोग्य तपासणी यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध आहेत.
आदेश काय म्हणतो?
केंद्र सरकारने काढलेल्या नवीन आदेशांनुसार पुरुष कर्मचाऱ्यांना त्यांचे आई-वडील किंवा सासू-सासरे यांना लाभार्थी म्हणून समाविष्ट करण्याची संधी असणार आहे. पण यात एक अट ठेवण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे आई-वडील आणि सासू-सासरे त्यांच्यासोबत राहतात किंवा आर्थिकदृष्ट्या त्यांच्यावर अवलंबून आहेत, अशांनाच ही सुविधा मिळणार आहे.
यांना मिळणार लाभ
केंद्र सरकारच्या या आरोग्य योजनेचा लाभ सरकारी कर्मचारी, आजी-माजी खासदार, माजी राज्यपाल आणि नायब राज्यपाल, स्वातंत्र्य सैनिक, माजी राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे विद्यमान आणि माजी न्यायाधीश, केंद्र सरकारकडून मान्यता प्राप्त पत्रकार, दिल्लीतील कर्मचारी यांना मिळणार आहे. शिवाय पोलीस, रेल्वे बोर्ड कर्मचारी आणि पोस्ट ऑफिसचे कर्मचाऱ्यांचा सुद्धा यात समावेश करण्यात आला आहे.