नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्र सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार बरेच दिवसांपासून पेंडींग आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात जाण्याची स्वप्न बघणारे अधांतरीच लटकले आहेत. अश्यात पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुका लक्षात घेता लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे संकेत मिळत आहेत. पण या मंत्रीमंडळातून महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांना डच्चू मिळणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळ विस्ताराचे संकेत दिलेले नसले तरीही पुढील वर्षीची लोकसभा निवडणूक आणि दहा राज्यांमधील विधानसभा निवडणूक लक्षात घेता लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, असे दिसत आहे. पण या मंत्रीमंडळातून एकूण ११ मंत्र्यांना पायउतार होण्यास सांगितले जाणार आहे. त्यातही दोन मंत्री महाराष्ट्राचे असणार आहेत, अशी चर्चा विरोधकांमध्ये रंगत आहे. त्यामुळे मंत्रीमंडळ विस्तार हा अनेकांसाठी सुखद तर ११ लोकांसाठी दुःखद ठरण्याची शक्यता आहे. या अकरा जणांच्या यादीत कुणाचा नंबर लागतो, या विचाराने मंत्रीमंडळात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पक्षाचे काम
मंत्रीमंडळातून डच्चू दिला तरी या नेत्यांना पक्ष संघटनेचे काम करण्याची जबाबदारी दिली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत आपली भूमिका चोख पार पाडण्याची एक उत्तम संधी त्यांना मिळणार आहे. अर्थात पक्ष संघटनेपेक्षा मंत्रीमंडळात रमणे कुणालाही आवडणारेच असते, त्यामुळे त्याचे दुःख असणारच आहे.
शिंदे गटाची लॉटरी
मोदींच्या मंत्रीमंडळ विस्तारात ११ जणांना बाहेरचा रस्ता दाखविताना तेवढ्याच लोकांना प्रवेशही मिळणार आहे. यात आपला नंबर लावण्यासाठी आता लॉबिंग सुरू झालेले आहे. पण, महाराष्ट्रात देवेंद्र यांना भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रीमंडळे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी भाजपमधीलही एका मोठ्या नेत्याला केंद्रात संधी मिळणार असल्याचेही बोलले जात आहे.
अर्थसंकल्पापूर्वी विस्तार
अलीकडेच भाजपच्या केंद्रीय कार्यकारीणीची बैठ दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर मंत्रीमंडळ विस्ताराच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. केंद्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
Union Cabinet Narendra Modi Reshuffle Some Minister Skipped