नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पूर्वी रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडला जायचा. मोदी सरकारने मात्र ही पद्धत बदलून रेल्वे विभागाचाही मूळ अर्थसंकल्पात समावेश केला. बुधवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी १६ हजार कोटीहून अधिकच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. बहुप्रतीक्षित वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.
संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. गेल्या आठ वर्षात महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना मिळणाऱ्या निधीमध्ये १० पटीने वाढ झाली आहे. २०१४ मध्ये महाराष्ट्राला रेल्वेच्या प्रकल्पांसाठी केवळ १६०० कोटी रुपये मिळत होते. गेल्या वर्षी ही रक्कम १६ हजार कोटींवर पोहोचली आहे. यावर्षीच्या अंदाजपत्रकात रेल्वेला २ लाख ४० हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
वर्धा-यवतमाळ-नांदेड प्रकल्पामुळे विकासाला बेग
राज्यातील तीन रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. विदर्भ व मराठवाडा या भागांना जोडणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. यात वर्धा-यवतमाळ-नांदेड, नगर-बीड-परळी व नागपूर-नागभीड या रेल्वे मार्गांचा समावेश आहे. येत्या वर्षात सर्व ब्रॉडगेज रेल्वेचे विद्युतीकरण करण्याचा मानस असल्याचे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले.
दोन वंदे भारत ट्रेन
देशात ४०० नव्या वंदेभारत ट्रेन सुरू केल्या जाणार असून त्यात १० ट्रेन महाराष्ट्रात सुरू होणार आहे. मुंबई-शिर्डी व मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत ट्रेनना येत्या १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखविणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.
गडचिरोलीतील रेल्वे प्रकल्पाला वेग
नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेरूळाचे जाळे विनले जाणार आहे. नागपूर -नागभीड -वडसा प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे. सोबतच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या विकासावर १८०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
Union Budget Maharashtra Railway Projects Fund