मुंबई, (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे.
यंदाच्या बजेटमध्ये कररचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोकरदारांच्या मनात थोडी निराशा निर्माण झाली आहे. या शिवाय कृषी क्षेत्रावर या अर्थसंकल्पात विशेष दृष्टीक्षेप टाकण्यात आला असून त्यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे. या शिवाय तेलबिया आयात कमी करण्याचा प्रयत्न असून तेलबिया उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर देण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पिकांच्या मूल्यांकनासाठी, जमिनीच्या डिजिटल नोंदणीसाठी, किटक नाशकांच्या फवारणीसाठी किसान ड्रोन्सचा वापर करणार आहे.
सेंद्रीय शेती, झीरो बजेट शेतीला प्रोत्साहत देण्यासह 9 लाख हेक्टर शेतीक्षेत्र सिंचनाखाली आणण्याची घोषणा करण्यात आली. तसेच, तंत्रज्ञानाचा वापर शेतीसाठी सुद्धा केला जाणार आहे. तसेच, शेतकऱ्यांना डिजिटल सेवा देणे आणि कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअप्सना नाबार्डच्या माध्यमातून मदत करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांकडून करण्यात आली. याचबरोबर देशातील राज्य सरकारांना त्यांच्या अभ्यासक्रमात शेतीविषयक अभ्यासक्रम समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे.
पंतप्रधान आवास योजनेसाठी ४८ लाख कोटींची तरतूद; तसेच ग्रामीण आणि शहरी भागांत गरिबांसाठी घरे उभारणार असून परवडणाऱ्या घरांसाठी खासगी विकासकांशी चर्चा करणार असल्याचे अर्थमंत्री यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रावरही अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. यावेळी त्यांनी काही वस्तू स्वस्त करून मोठा दिलासा दिला आहे.
मोबाईल फोन चार्जरचा ट्रान्सफार्मर आणि कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क घटवण्यात आले आहे. त्यामुळे मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार आहेत. तसेच देशात निर्माण होणारे मोबाईलही स्वस्त होणार आहेत.
काही केमिकल्सवरील कस्टम ड्युटी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मिथेनॉलचा समावेश आहे. देशांतर्गत मॅन्यूफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्टिल स्क्रॅपवरील कस्टम ड्युटीवरही सूट एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. तसेच जेम्स अँड ज्वेलरी स्वस्तात मिळणार आहेत.
हे स्वस्त होणार
चामडे, बूट, चपला, विदेशी सामान, कपडे
शेतीशी संबंधित वस्तू, पॅकेजिंग डब्बे, पॉलिश केलेले डायमंड (हिऱ्याचे दागिने),
परदेशी छत्र्या, मोबाईल फोन, मोबाईल चार्जर, जेम्स अँड ज्वेलरी
हे महाग होणार
विमान प्रवास, छत्र्या, तंबाखू, क्रिप्टोकरन्सीमधील गुंतवणूक