इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंधनांसह जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे भडकलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिलासा आहे. दोन्ही सरकारांनी प्रत्येकी ३ टक्के महागाई भत्त्याची वाढ केली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हे सर्व कर्मचारी महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करीत होते. अखेर सरकारने वाढत्या महागाईत दिलासादायक निर्णय घेतला आहे.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज महागाई भत्ता वाढीची घोषणा केली. त्यास काही तास होत नाही तोच राज्य सरकारनेही महागाई भत्ता वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दोन्ही सरकारांनी प्रत्येकी ३ टक्के महागाई भत्ता वाढ करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. त्याशिवाय निवृत्तीवेतन धारकांनाही याचा लाभ होणार आहे.
केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महागाई भत्ता आता ३४ टक्क्यांवर गेला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महागाई भत्ता जानेवारी २०२२ पासून मिळणार आहे. म्हणजेच, गेल्या ३ महिन्यांचाही महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. केंद्र सरकारचे ४८ लाख कर्मचारी तर ६९ लाख पेन्शनधारकांना याचा लाभ मिळणार आहे.
राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर महागाई भत्त्याची घोषणा करुन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नववर्षाची मोठी भेट दिली आहे.
भत्तेही वाढणार
केंद्र व राज्य सरकारचे अनेक भत्ते हे महागाई भत्ताशी निगडीत असतात. आता महागाई भत्ता वाढल्याने अन्य भत्त्यांमध्येही वाढ होणार आहे. केंद्र सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात वाढ करते. आता पुढील वाढ ही जुलै २०२२ होण्याची चिन्हे आहेत.
अर्थव्यवस्थेवर परिणाम
सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्याने सहाजिकच पगारही वाढणार आहे. परिणामी, सरकारी कर्मचारी विविध प्रकारची खरेदी करण्यासाठी बाजारात जातील. या खरेदी-विक्रीमुळे बाजारात चलनवलन वाढण्यास मदत होणार आहे.