नवी दिल्ली – डिजिटल पेमेंटमध्ये युनिफाइड पेमेंट सिस्टिम (यूपीआय) चे यश पाहून आता रिझर्व्ह बँकेने यूपीआय वॉलेटचा प्रस्ताव दिला आहे. यासाठी यूपीआय आता आपले वॉलेट सादर करणार आहे. याच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने पेमेंट करता येणार आहे. वॉलेटला लहान पेमेंट करणार्यांना समोर ठेवून बनविण्यात आले आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार यूपीआयद्वारे करण्यात येणार्या पेमेंटमध्ये लहान रकमेची भागिदारी ५० टक्के ठरविण्यात आली आहे.
इंटरनेट कनेक्शन चांगले नसल्यास आर्थिक व्यवहार अपयशी ठरण्याची शक्यता असते. हे गृहित धरून यूपीआय वॉलेटच्या माध्यमातून विना इंटरनेटही आर्थिक व्यवहार करता येणार आहे. तसेच यूपीआयचे स्वतःचे वॉलेट असल्याने दुसर्या कोणत्याही कंपन्यांचे वॉलेट वापरण्याची गरज निर्माण होणार नाही. लहान रकमेचे पेमेंट यूपीआयद्वारे करण्याची लोकप्रियता हे दर्शवते की नागरिक डिजिटल पेमेंटसाठी गंभीर आहेत. त्यामुळे ही सेवा अधिक सुविधाजनक बनविण्याची गरज आहे, असे आरबीआयने म्हटले आहे.
कोणाला होणार फायदा
रिझर्व्ह बँकेने लहान रकमेचे व्यहार करणार्या ग्राहकांना लक्षात घेऊन याचा प्रस्ताव दिला आहे. यूपीआयद्वारे ५० टक्के पेमेंट २०० रुपयांहून कमी रकमेचे असतात. यूपीआयमुळे थेट बँक खात्यातून पेमेंट होत असल्याने बँक विवरण खूपच लांबलचक आणि प्रदीर्घ होते. यूपीआयच्या वॉलेटमुळे याला आळा बसेल.
कसे काम करणार
विना इंटरनेट हे वॉलेट काम करू शकेल. यूपीआयच्या अॅपमध्ये वॉलेटचा पर्याय असेल. त्या वॉलेटमध्ये तुमच्या बँक खात्यातून गरजेनुसार पैसे टाकून पेमेंट करू शकता येणार आहे. सारखे बँकेच्या खात्यातून पेमेंट करावे लागणार नाही. सध्या इतर कंपन्यांच्या वॉलेटचा वापर करावा लागतो आहे.