मुंबई – भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात कुठल्याही सिस्टीममधून चोरी करण्याचे मार्ग अतीजलद तयार होतात. त्यातल्या त्यात पैसा चोरण्याचे मार्ग तर कधीच कमी नसतात. कोरोना काळात भारत सरकारने व भारतीय रिझर्व्ह बँकेने आनलाईन आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन दिले. त्यामुळे लोकांनीही युपीआय म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसचा वापर मोठ्या प्रमाणात केला. आजही त्याचाच वापर जास्त होत आहे. पण त्यातही धोका होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
काय आहे युपीआय?
युपीआय ही एक आंतर बँक फंड ट्रान्सफर सुविधा आहे. या सुविधेच्या माध्यमातून स्मार्टफोनवर फोननंबर आणि व्हर्च्युअल आयडीच्या मदतीने पेमेंट केले जाऊ शकते. युपीआय हे इंटरनेट बँक फंड ट्रान्सफर यंत्रणेवर आधारित आहे. एनपीसीआयच्या माध्यमातून ही सिस्टीम कंट्रोल केली जाते. युपीआयच्या माध्यमातून युजर्स काही क्षणात पैसे ट्रान्सफर करू शकतात.
सुरक्षेचे काय?
युपीआय किती सुरक्षित आहे, हा मुख्य प्रश्न आहे. डिजीटल आर्थिक व्यवहार ग्राहकांसाठी लाभदायक असले तरीही तेवढेच धोकादायकही आहे. देशात हे नवे तंत्र वापरण्याचे प्रमाण वाढत असतानाच आनलाईन फसवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. सर्वसामान्यांना फसविण्यासाठी हॅकर्स दररोज नवनवे तंत्र शोधून काढत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये सायबर क्राईमच्या घटनांच्या माध्यमातून लोकांचे लाखो रुपये उडविल्याची माहिती पुढे आली आहे.
युपीआय पीन कुठे वापरावे?
काही संशयास्पद व्यवहार करणारे एप तुमची खासगी माहिती काढून घेतात. त्यात पैसे ट्रान्सफर करण्याची माहितीही सामील असते. अश्या एपपासून आपण दोन हात लांब राहिले पाहिजे. युपीआय पीन सांभाळून ठेवत फ्रॉडपासून स्वतःचा बचाव केला पाहिजे. त्यासाठी भीम युपीआयसारख्या सुरक्षित एपवरूनच व्यवहार करण्याला प्राधान्य दिले पाहिजे.
तरच युपीआय पीन वापरा
आर्थिक व्यवहार करताना कुणाला पैसे पाठवायचे असतील तर तुम्हाला युपीआय पीन विचारला जाईल. पण एखाद्या ठिकाणाहून तुम्हाल पैसे मिळतील युपीआय पीन सांगा असे कुणी म्हणाले तर ते फ्रॉड आहे असे समजा. कुणालाही युपीआय पीन सांगू नका.