नवी दिल्ली – “जगातील लहान मुलांच्या आरोग्याची स्थिती 2021; माझ्या मनावरील परिणाम: बालकांच्या मानसिक आरोग्याच्या मुद्याला प्रोत्साहन देणे, संरक्षण पुरविणे आणि काळजी घेणे” हा युनिसेफचा अहवाल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी प्रकाशित केला. लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर कोविड-19 महामारीमुळे झालेल्या महत्त्वाच्या परिणामांबाबत या अहवालात विस्तृत माहिती दिली आहे.
हा अहवाल आज जागतिक पातळीवर प्रकाशित करण्यात आला. मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या अहवालाच्या महत्त्वाबाबत बोलताना मांडवीय म्हणाले की, “मानसिक आरोग्य ही पूर्वापार चालत आलेली समस्या आणि नव्याने उदयाला येणारा प्रश्न अशा दोन्हीकडून महत्त्वाचा आहे.आपले पारंपरिक वैद्यकशास्त्र पूर्णपणे समग्र आरोग्य आणि संपूर्ण स्वास्थ्य प्राप्तीवर भर देत असताना, भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये मानसिक आरोग्याबाबतच्या समस्या वाढताना दिसत आहेत.”
ग्रामीण- शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या स्वतःच्या एकत्र कुटुंबाचे उदाहरण देत त्यांनी त्यांनी स्पष्ट केले की लहान मुले आणि किशोरवयीन मुला-मुलींना पालकांकडून कधीकधी टाळल्या जात असलेल्या मुद्यांबाबत मार्गदर्शन मिळविण्यासाठी अथवा मानसिक तणावाबाबत मन मोकळे करण्यासाठी अशा प्रकारच्या कुटुंब व्यवस्थेत इतर सदस्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. विभक्त कुटुंब संस्कृतीने दुरावलेपणात वाढ करून परिणामी मानसिक तणाव निर्माण केला आहे असे ते पुढे म्हणाले.
संपूर्ण समाजासाठी कोविड-19 चा संसर्ग ही मानसिक तणाव सहन करण्याची परीक्षाच होती हा मुद्दा अधोरेखित करत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेच्या कालखंडात औषध निर्माण मंत्री म्हणून आलेल्या व्यक्तिगत अनुभवांची उजळणी केली.
“त्या काळात औषधनिर्मिती क्षमता वाढविणे आवश्यक झाले होते आणि नवी औषधनिर्मिती एकके उभारण्यासाठी आवश्यक असणारी अधिकृत प्रक्रिया अधिक वेगवान करणे गरजेचे होते. त्या काळात अनेक लोकांचा बळी जात असताना असे काम करणे अत्यंत तणावपूर्ण होते, असे ते म्हणाले. योगाभ्यास, खोल श्वसन आणि नियमितपणे सायकल चालविणे यामुळे या तणावपूर्ण परिस्थितीवर मात करणे शक्य झाले असे त्यांनी पुढे सांगितले.
युनिसेफचे भारतातील प्रतिनिधी डॉ.यास्मिन अली हक् यांनी या अहवालातील काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष उपस्थितांसमोर मांडले. जगातील बालकांची स्थिती 22021 नामक या अहवालात दिसून आले आहे की भारतातील 15 ते 24 वर्षे वयोगटातील 14% युवक-युवती किंवा दर 7 व्यक्तींमधील 1 व्यक्ती उदासीनतेने ग्रस्त होती किंवा काहीही करण्यास अनुत्सुक होती. “सध्याची लहान मुले मानसिक शोकांतिकेचे जीवन जगत आहेत, इतकेच नव्हे तर त्यापैकी अनेकांना दुर्लक्षित आणि गैरवर्तनाचा मोठा धोका आहे,” असे त्या म्हणाल्या.